सुसाट कंटेनरची कारनंतर ट्रकला धडक; पैठणरोडवर रात्रभर वाहतूक खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:04 IST2020-02-03T18:03:31+5:302020-02-03T18:04:15+5:30
राँगसाईडने घुसलेल्या कंटेनरचालकाने लिंकरोडकडून येणाऱ्या पुस्तकाच्या ट्रकला धडक दिली.

सुसाट कंटेनरची कारनंतर ट्रकला धडक; पैठणरोडवर रात्रभर वाहतूक खोळंबा
औरंगाबाद: बीडबायपासवर एका कारला उडविल्यानंतर सुसाट पुढे निघालेल्या कंटनेरने पैठण रोडवरला समोरून आलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातानंतर कंटेनर आणि मालवाहू ट्रक उलटल्याची घटना रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत मात्र तीन वाहनांचे नुकसान झाले आणि कारचालकाला किरकोळ दुखापत झाली.
याविषयी अधिक माहिती देताना सातारा पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास टायरची वाहतूक करणारा कंटेनरचालक बीडबायपासने गोदावरी टी पॉर्इंटकडून महानुभाव आश्रम चौकाकडे सुसाट निघाला होता. यावेळी हॉटेल इंडियानासमोर या कंटेनरचालकाने कारला एकाबाजून दाबल्याने कारचे नुकसान झाले. यात कारचालक किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर घटनास्थळी न थांबता कंटेनरचालक पुढे पैठणरोडच्या दिशेने सुसाट निघाला. काही अंतरावरील सीड कंपनी समोरील पुलावर राँगसाईडने घुसलेल्या कंटेनरचालकाने लिंकरोडकडून येणाऱ्या पुस्तकाच्या ट्रकला धडक दिली.
या अपघातात पुस्तकाच्या ट्रकचालक आणि कंटेनरचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि दोन्ही वाहने रस्त्यावर उलटले. याघटनेत दोन्ही वाहनांतील चालकांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे,सहायक उपनिरीक्षक चौहान आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील आडवे पडलेला पुस्तकाचा ट्रक आणि टायर घेऊन जाणारा कंटनेर रस्त्यावरून बाजूला हटविला. तसेच खाली पडलेला मालही रस्त्यावरून उचलण्याचे काम सोमवारी सकाळपर्यंत सुरू होते. या अपघातामुळे पैठण रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी युद्धपातळीवर काम केल्याने सकाळनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.याविषयी कंटनेरचालकाविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कंटेनरचालक होता दारूच्या नशेत
कार आणि ट्रकला उडविणाऱ्या सुसाट कंटेनरचा चालक मुश्ताक अहेमद( ३०,रा. मेवाड, हरियाणा)हा दारूच्या नशेत वाहन चालवित होता. अपघातानंतर पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत तो मद्याच्या अंमलाखाली असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्याचे पोलीस निरीक्षक पोटे यांनी सांगितले.