काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, महाविकास आघाडी, की ‘एकला चलो रे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 15:55 IST2021-11-30T15:54:14+5:302021-11-30T15:55:33+5:30
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर राहिला. एमआयएमने शिवसेनेचा पराभव केला.

काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, महाविकास आघाडी, की ‘एकला चलो रे’
- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागविला आहे. प्रत्यक्षात काय घडते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रत्येक पक्ष स्वबळाचीच तयारी करीत असतो; परंतु निवडणुका जिंकण्यासाठी तडजोडी कराव्याच लागतात, हा नेहमीचा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळ आजमावून नंतरही आघाडी करून सत्ता संपादण्याचे प्रयत्न होत असतात.
जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही
जिल्ह्यातील नऊ आमदारांपैकी सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही. पैठण, कन्नड, वैजापूर, सिल्लोड-सोयगाव आणि औरंगाबाद मध्य व पश्चिममधून शिवसेनेचे आमदार विजयी झाले. गंगापूर- खुलताबाद, फुलंब्री व औरंगाबाद पूर्वमधून भाजपला कौल मिळाला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा विधान परिषदेचा एकही सदस्य नाही. अत्यंत वाईट परिस्थिती आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेसचीच सत्ता
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मीना शेळके यांच्या रूपाने काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्या महाविकास आघाडीच्या बळावर. एकूण ६२ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत शिवसेना २४, काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि भाजपचे २३ व अपक्ष ३ सदस्य असे बलाबल आहे. तसे तर काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आले होते; परंतु अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर सहा सदस्य गेले; परंतु महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे काँग्रेसच्या वाट्याला अध्यक्षपद आले आहे.
पंचायत समित्यांत दोन नंबरवर
जिल्ह्यातील एकही पंचायत समिती सध्या काँग्रेसच्या ताब्यात नाही. जी होती, त्या औरंगाबाद पंचायत समितीत मध्यंतरी राजकारण घडले आणि आता ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे. भाजपकडे फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड पंचायत समित्या आहेत. सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि वैजापूर पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे.
लोकसभेला तीन नंबरवर
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर राहिला. एमआयएमने शिवसेनेचा पराभव केला. मागील चार वेळा शिवसेनेने हा गड राखला होता. काँग्रेसच्या वाट्याला सतत अपयशच येत गेले आहे.
लवकरच निवडणुका
जिल्ह्यात आगामी काळात जिल्हा परिषद, सोबतच पंचायत समित्या, नगर परिषदांच्या आणि औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. फक्त अधिकृत तारखांची प्रतीक्षा सुरू आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणतात...
जो आदेश येईल, तो पाळला जाईल. स्वबळाचा नारा दिला गेला आहेच. त्यादृष्टीनेही चाचपणी सुरू आहे.
- डॉ. कल्याण काळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष