काँग्रेसकडून स्वबळाची तयारी; महापालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:00 IST2020-12-18T17:50:57+5:302020-12-18T18:00:40+5:30
मनपा निवडणूक गांभीर्याने घ्या व महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकवता येईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा मूलमंत्रच यावेळी अमित देशमुख यांनी दिला.

काँग्रेसकडून स्वबळाची तयारी; महापालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड लढवणार
औरंगाबाद : महापालिकेची आगामी निवडणूक गांभीर्याने घेऊन सर्व वाॅर्ड लढवण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी मुंबईत गांधी भवनात प्रदेश काँग्रेसतर्फे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व औरंगाबादचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबादचे काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
मनपा निवडणूक गांभीर्याने घ्या व महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकवता येईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा मूलमंत्रच यावेळी अमित देशमुख यांनी दिला. प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे त्यांनी आधीच मुजफ्फर हुसेन, किशोर गजभिये व दादासाहेब मुंडे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, ही बाबही देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली.
बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनोगते व सूचना त्यांनी जाणून घेतल्या. तूर्तास महाविकास आघाडीचा विचार न करता स्वबळावर लढाईची तयारी करा यावर त्यांनी भर दिला. पाच पाच वॉर्डांची जबाबदारी एकेका पदाधिकाऱ्यांवर टाकायची व ही निवडणूक सोपी करायची व मदतीला आमदार धीरज देशमुख यांनाही पाठवण्याचेही यावेळी ठरले. धीरज देशमुखही बैठकीस उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, आमदार राजेश राठोड, माजी आमदार एम. एम. शेख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, अनिल पटेल, डॉ. जफर पठाण, डॉ. जितेंद्र देहाडे, अशोक सायन्ना, नामदेव पवार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानखडे, शहराध्यक्षा सीमा थोरात, ॲड. इक्बालसिंग गिल, हमद चाऊस, मुजफ्फर खान पठाण, मोहित जाधव, डॉ. अरुण शिरसाठ, खालेद पठाण आदींची बैठकीस उपस्थिती होती. दादासाहेब मुंडे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. सचिन शिरसाट यांनी आभार मानले.