छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर ६३ वर्षांत १७ अध्यक्षांसह सर्वाधिक ३५ वर्षे काँग्रेसचे अधिराज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:58 IST2026-02-05T19:58:06+5:302026-02-05T19:58:24+5:30

सव्वा चौदा वर्षांचे प्रशासक राज; सत्तेच्या वारशाचे आले रंजक योगायोग

Congress has ruled Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad for the longest time, with 17 presidents in 63 years, for 35 years. | छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर ६३ वर्षांत १७ अध्यक्षांसह सर्वाधिक ३५ वर्षे काँग्रेसचे अधिराज्य

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर ६३ वर्षांत १७ अध्यक्षांसह सर्वाधिक ३५ वर्षे काँग्रेसचे अधिराज्य

- जयेश निरपळ
गंगापूर :
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे पहिले पाऊल पडले आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला. गेल्या ६३ वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात जिल्ह्याने केवळ सत्तांतरेच पाहिली नाहीत, तर सत्तेचे अनोखे वारसाहक्क, प्रशासकीय कालखंड आणि ऐतिहासिक विक्रमांची अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. ३० अध्यक्षांच्या या मांदियाळीत एका बाजूला राजकीय पक्षांचे वर्चस्व टिकवण्याची धडपड दिसली, तर दुसऱ्या बाजूला काही तालुक्यांच्या वाट्याला आलेली दीर्घ प्रतीक्षा आजही कायम आहे.

जिल्हा परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत (१० फेब्रुवारी २०२६ पर्यंत) एकूण ६३ वर्षे ५ महिने आणि २९ दिवसांचा काळ लोटला आहे. यापैकी सर्वाधिक ३५ वर्षे ५ महिने आणि २० दिवस काँग्रेसने सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवली. काँग्रेसच्या एकूण १७ सदस्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. त्याखालोखाल शिवसेनेचे ८ अध्यक्ष (१२ वर्षे २ महिने १० दिवस), भाजपचे ३ अध्यक्ष (९ महिने १४ दिवस), तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशा प्रत्येकी एका सदस्याला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

पहिले अध्यक्ष आणि महिला नेतृत्व
१२ ऑगस्ट १९६२ रोजी औरंगाबाद तालुक्यातील पिंपरीराजा येथील पद्मश्री सखाराम पा. पवार यांना जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. सुरुवातीची सलग १८ वर्षे ८ महिने जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. महिला नेतृत्वाचा विचार करता, २१ मार्च १९९७ रोजी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या अभयाताई काळुसे (काँग्रेस) यांना जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. २० मार्च १९९९ रोजी गंगापूर तालुक्यातील एकनाथ जंजाळे हे शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष बनले. तर २१ मार्च १९९८ रोजी आसाराम तळेकर हे भाजपचे पहिले अध्यक्ष म्हणून विराजमान झाले. २०१३ मध्ये विजया चिकटगावकर यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले, त्या राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. १९९९ मध्ये अपक्ष विठ्ठलराव थोरात यांनी २५ दिवस प्रभारी अध्यक्षपद भूषवले होते.

१५ वर्षांची प्रशासकीय राजवट
जिल्हा परिषदेच्या इतिहासात दोन वेळा मोठी खंडित अवस्था आली, जेव्हा लोकनियुक्त मंडळाऐवजी प्रशासकांकडे सूत्रे होती. १ मे १९८१ ते २० मार्च १९९२ आणि २२ मार्च २०२२ ते आजतागायत, अशी एकूण १४ वर्षे ९ महिने जिल्हा परिषदेवर प्रशासकराज राहिले आहे.

बाप-मुलगा आणि सासरा-सून : सत्तेचा वारसा
जिल्हा परिषदेत काही रंजक योगायोगही पाहायला मिळाले. यात १९६७ ते १९७२ या काळात माणिकराव पालोदकर (सिल्लोड) अध्यक्ष होते, त्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रभाकर पालोदकर यांनी १९९२ ते १९९७ या काळात पद भूषवले. बाप-लेकाने अध्यक्षपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे. तसेच साहेबराव पाटील डोणगावकर यांनी दोन वेळा अध्यक्षपद भूषवले, तर त्यांच्या सूनबाई ॲड. देवयानी डोणगावकर यांनी २०१७ ते २०२० या काळात अध्यक्षपद सांभाळून सासरा-सून असा दुर्मीळ योग जुळवून आणला.

ठोंबरे यांचा आगळा विक्रम
फुलंब्री तालुक्यातील राजेंद्र ठोंबरे यांनी २००७ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले होते. पुढे फुलंब्री नगरपंचायत झाल्यावर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. र्अध्यक्ष ते नगराध्यक्ष’ असा प्रवास करणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत.

खुलताबाद तालुक्याला अद्यापही प्रतीक्षा
तालुकावार विचार करता सिल्लोड तालुक्याने सर्वाधिक ६ वेळा अध्यक्षपद मिळवले आहे. औरंगाबाद आणि गंगापूरला ५ वेळा, कन्नड व वैजापूरला ४ वेळा, तर फुलंब्री, पैठण आणि सोयगावला प्रत्येकी २ वेळा ही संधी मिळाली. मात्र, ६४ वर्षांचा इतिहास असूनही खुलताबाद तालुक्याला अद्याप एकदाही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवता आलेले नाही, ही प्रतीक्षा आजही कायम आहे.

Web Title : कांग्रेस का छत्रपति संभाजीनगर जिला परिषद पर 35 वर्षों तक वर्चस्व।

Web Summary : कांग्रेस ने 63 वर्षों में 35 वर्षों तक छत्रपति संभाजीनगर जिला परिषद की सत्ता संभाली, 17 अध्यक्ष रहे। शिवसेना के 8 अध्यक्ष रहे। कुछ परिवारों में पिता-पुत्र और सास-बहू का उत्तराधिकार देखा गया। खुलताबाद तालुका को अभी भी अपने पहले अध्यक्ष का इंतजार है।

Web Title : Congress dominated Aurangabad Zilla Parishad for 35 years with 17 presidents.

Web Summary : For 63 years, Congress held Aurangabad Zilla Parishad's power for 35 years, with 17 presidents. Shiv Sena followed with 8 presidents. Some families saw a father-son and mother-in-law succession. Khultabad Taluka still awaits its first president.