दिलासा ! गुंठेवारीतील पाडापाडीला तूर्त स्थगिती; पालकमंत्री सुभाष देसाईंची मनपाला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 15:01 IST2021-10-26T14:59:22+5:302021-10-26T15:01:03+5:30
Subhash Desai : दिवाळीत पाडापाडी नको, अशा सूचना सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai) यांनी प्रशासकांना दिल्या.

दिलासा ! गुंठेवारीतील पाडापाडीला तूर्त स्थगिती; पालकमंत्री सुभाष देसाईंची मनपाला सूचना
औरंगाबाद : गुंठेवारी कायद्याअंतर्गंत ३१ डिसेंबर २०२०पूर्वी बांधलेली अनधिकृत घरे अधिकृत करून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात दोन लाखांहून अधिक घरे अनधिकृत आहेत. महापालिकेकडे ( Aurangabad Municipal Corporation) अत्यंत कमी प्रस्ताव आल्याने १ नोव्हेंबरपासून पाडापाडी सुरू करण्याचा इशारा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मागील आठवड्यात दिला होता. दिवाळीत पाडापाडी नको, अशा सूचना सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai) यांनी प्रशासकांना दिल्या. त्यामुळे औरंगाबादकरांना किंचित दिलासा मिळाला आहे.
बांधकामे अधिकृत करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर देण्यात आली आहे. १ नोव्हेंबर रोजी महापालिकेतून जेसीबी, बुलडोझर बाहेर निघेल. शहरातील किमान एक तरी मालमत्ता जमीनदोस्त करून यंत्रणा परत येईल, असे प्रशासक पाण्डेय यांनी जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक बांधकामांवर हातोडा टाकण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे गुंठेवारी भागातील व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई हे शहरात आले असता आमदार, माजी नगरसेवकांनी त्यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा याची दखल घेत पालकमंत्री देसाई यांनी गुंठेवारीधारकांना दिलासा देण्यासंदर्भातील निर्देश प्रशासकांना दिले.
त्रिमूर्ती चौकात कारवाईची तयारी...
पहिल्या टप्प्यात महापालिकेने शहरातील त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर गुंठेवारी क्षेत्रातील व्यावसायिक बांधकामे तोडण्याची तयारी केली होती. तूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमित करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे, अशी माहिती आ. अंबादास दानवे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.