संतापजनक! 'खाऊ देतो इकडे ये',चार वर्षीय चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 19:27 IST2022-02-21T19:26:54+5:302022-02-21T19:27:15+5:30
गुन्हा दाखल : बजाजनगरातील धक्कादायक घटना

संतापजनक! 'खाऊ देतो इकडे ये',चार वर्षीय चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
वाळूज महानगर : एका चार वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घराच्या गच्चीवर नेऊन दोघा अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी बजाजनगरात घडली. या प्रकरणी चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी शेजारील एक १३ वर्षीय व दुसऱ्या १० वर्षीय मुलाने चिमुकलीस खाऊ देत आपण गच्चीवर जाऊन खाऊ, असे म्हणून गच्चीवर नेले. तेथे दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या चिमुकलीने रडत आईकडे जाऊन आपबीती कथन केली. तिच्या आईला धक्का बसला. रात्री पती घरी आल्यानंतर आपल्या चिमुकलीवर शेजारील दोघांनी अत्याचार केल्याचे सांगितले. रात्री मुलीवर घरच्या घरी उपचार केल्यानंतर घाबरलेल्या तिच्या पालकांनी तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी चिमुकलीस घेऊन पालक खासगी रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.
चिमुकलीच्या आईने रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा साळुंके यांना माहिती दिली. साळुंके यांनी चिमुकलीच्या पालकांना एमआयडीसी वाळूज ठाण्यात आणले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहा. पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी माहिती जाणून घेतली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. घुनावत हे करीत आहेत.