थंडीत रक्तवाहिन्या आखडून वाढते ‘ब्लडप्रेशर’; गंभीर धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:13 IST2025-12-11T19:13:00+5:302025-12-11T19:13:27+5:30
ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, थंडीत त्यांचा बीपी आणखी वाढण्याची शक्यता जास्त असते.

थंडीत रक्तवाहिन्या आखडून वाढते ‘ब्लडप्रेशर’; गंभीर धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
छत्रपती संभाजीनगर : थंडीच्या दिवसांत रक्तदाब वाढू शकतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहाला अधिक दाब लागतो. ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा आजार आहे, त्यांच्यासाठी ही समस्या अधिक गंभीर ठरू शकते. तापमान घटत असताना हृदयावरचा ताणही वाढतो, त्यामुळे पुरेशी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
तापमानात चढ-उतार
शहरातील तापमानात सतत चढ- उतार होत असताना गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. शहरातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
थंडीत हाय बीपी असलेल्यांना अधिक धोका
ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, थंडीत त्यांचा बीपी आणखी वाढण्याची शक्यता जास्त असते. छातीत दडपण, चक्कर येणे अशी लक्षणे तीव्र होऊ शकतात.
गारठ्याने नसा आखडतात
थंडीचा परिणाम थेट रक्तवाहिन्यांवर होतो. नसा अरुंद झाल्याने रक्तप्रवाहाला प्रतिरोध निर्माण होतो. शरीर हा प्रतिरोध ओलांडण्यासाठी अधिक दाबाने रक्त पंप करते. यालाच बीपी वाढणे म्हणतात.
हृदयापर्यंत रक्त न पोहोचल्याने धोका
रक्तवाहिन्या संकुचित झाल्या तर हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्त मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे हृदयावर ताण वाढतो. यातून हृदयविकाराचा झटका येण्यासारखा धोका वाढतो.
हातापायाची बोटेही होतात कडक
थंडीमुळे शरीर सर्वात आधी हात-पायांमध्ये रक्तपुरवठा कमी करते. त्यामुळे बोटे थंड पडणे, कडक होणे, मुंग्या येणे अशी लक्षणे दिसून येतात. रक्तदाब अनियंत्रित असेल तर ही लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.
नेमके कशामुळे असे होते?
तापमान कमी झाल्यावर शरीराची ऊब राखण्यासाठी नसा आकुंचन पावतात. हृदयाला अधिक दाबाने रक्त पंप करावे लागते. ज्यांच्यात मिठाचे प्रमाण जास्त किंवा वजन वाढलेले आहे, त्यांच्यात बीपी आणखी वाढतो. शारीरिक हालचाली कमी झाल्यानेही बीपी वाढू शकतो
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे?
सकाळी थंडीत बाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावेत. गरम पाणी पिणे, वाफ घेणे, शरीराला कोमट ठेवणे. मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. रोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करावा. ध्यान, श्वसन व्यायाम करावे. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत. अचानक तापमान बदलापासून (थंडातून गरम/गरमातून थंडी) टाळावे.
रक्त घट्ट होते
थंडीमध्ये डिहायड्रेशन होऊन रक्त घट्ट होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. यातूनच हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.
- डाॅ. केदार रोपळेकर, हृदयरोगतज्ज्ञ
उबदार कपडे, रूम वाॅर्मर वापरा
वाढलेली थंडी वृद्ध व्यक्ती, हृदयविकार, पक्षाघाताच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. उबदार कपडे, रूम वाॅर्मरचा वापर करावा. काही त्रास जाणवल्यास वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. गणेश सपकाळ, हृदयरोगतज्ज्ञ