छत्रपती संभाजीनगरात थंडीचा कडाका; पहाटे-सायंकाळी हुडहुडी, पारा ११.८ अंशांपर्यंत घसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:25 IST2025-11-11T18:20:50+5:302025-11-11T18:25:01+5:30
सकाळच्या आणि सायंकाळच्या थंड वाऱ्यामुळे हुडहुडी जाणवते आहे.

छत्रपती संभाजीनगरात थंडीचा कडाका; पहाटे-सायंकाळी हुडहुडी, पारा ११.८ अंशांपर्यंत घसरला
छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या आठवड्यापासून किमान तापमान दररोज घसरत आहे. रविवार, ९ रोजी १२.८ अंश किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी एका अंशाने पारा घसरला. ११.८ अंश सेल्सिअसवर किमान तापमान राहिले, तर कमाल तापमानातही एक अंशाने घट झाली. २९.४ अंशांवर कमाल तापमान होते.
सकाळपासून थंडी जाणवत होती. दिवसभरात किमान तापमान ११.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. सकाळच्या आणि सायंकाळच्या थंड वाऱ्यामुळे हुडहुडी जाणवते आहे. सकाळी फिरायला जाणारे उबदार कपड्यांसह बाहेर पडत आहेत.
आठ दिवसांत ११ अंशांनी तापमान घसरले
नोव्हेंबरमध्ये किमान तापमान घसरण्याचा यंदा रेकॉर्ड झाला आहे. २ नोव्हेंबर २०२५ रोजी कमाल ३२ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. ९ नोव्हेंबरला ३०.४ कमाल, तर १२.८ किमान तापमान नोंदविले गेले. १० नोव्हेंबर रोजी कमाल तापमान २९.४, तर किमान तापमान ११.८ अंश सेल्सिअसवर होते. आठ दिवसांत ११ अंशांनी किमान तापमान घसरले.