छत्रपती संभाजीनगरात थंडीचे पुनरागमन; एका आठवड्यात सात अंशांनी घसरला पारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:18 IST2025-01-04T12:18:27+5:302025-01-04T12:18:44+5:30
किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसवर आले असून शहरात दिवसभर हलकी थंडी जाणवत आहे

छत्रपती संभाजीनगरात थंडीचे पुनरागमन; एका आठवड्यात सात अंशांनी घसरला पारा
छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात थंडीचे पुनरागमन झाले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सात अंशांनी पारा घसरला आहे. त्यामुळे थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
शुक्रवारी १२.६ अंश सेल्सिअसवर कमाल तापमान होते. मागच्या महिन्यात १५ दिवस थंडीचे, तर १५ दिवस ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचे राहिले. मागील दोन दिवसांपासून किमान तापमानामध्ये हळूहळू घट होत आहे. परिणामी, गुरुवारी थंडी जाणवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवार, ३ जानेवारी रोजी किमान तापमान २ अंशांनी घसरून १२.६ अंश सेल्सिअसवर आले.
गुरुवारी कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअसवर होते. शुक्रवारी कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअसवर होते. दिवसभर हलकी थंडी वातावरणात होती; परंतु सायंकाळनंतर गार हवा आणि थंडी जाणवण्यास सुरुवात झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जानेवारीत थंडीचे प्रमाण वाढेल. कमाल तापमानातही कमी-अधिक वाढ होत असल्यामुळे दमट व थंड अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव येतो आहे. दोन दिवसांपासून पहाटेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत थंडीचा कडाका जाणवतो आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेनंतर थंडी जाणवते आहे. सात दिवसांत २८ अंश सेल्सिअसवरून ३२ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले आहे.
३६ दिवसांत आठ वेळा हुडहुडी
२९ नोव्हेंबर ते ३ जानेवारी या ३६ दिवसांच्या काळात आठ वेळा पारा घसरला. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी ८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान १५ डिसेंबर रोजी नोंदविले गेले. २९ नोव्हेंबर रोजी १०.६, १६ डिसेंबर रोजी ९.६, १७ डिसेंबर रोजी १०.७, १८ डिसेंबर रोजी ११, १९ डिसेंबर रोजी ९.७, तर ३९ डिसेंबर रोजी १२.४ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान होते.