जिवलग मित्रच निघाला रेल्वे स्थानकावरील हमालाचा खूनी, मध्य प्रदेशातून आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 20:26 IST2024-08-21T20:25:36+5:302024-08-21T20:26:05+5:30
लोहमार्ग पोलिसांनी मध्य प्रदेशातून आरोपीला घेतले ताब्यात

जिवलग मित्रच निघाला रेल्वे स्थानकावरील हमालाचा खूनी, मध्य प्रदेशातून आरोपी ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्थानकावर धारदार शस्त्राने वार करून योगेंद्र किशोरीलाल उईके (वय ३९) याची हत्या करण्यात आली होती. सलग सहा दिवस तपास करून लोहमार्ग पोलिसांनी त्याचा जीवलग मित्र असलेला मारेकरी अनिल सेवकराव उईके (२५) याला मध्य प्रदेशातून अटक केली.
८ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली होती. मूळ भोपाळजवळील कोलुआ खुर्दचा असलेला योगेंद्र दोन महिन्यांपूर्वीच शहरात कामाच्या शोधात आला होता. हमाल म्हणून काम करणारा योगेंद्र रेल्वे स्टेशनबाहेरही कामासाठी बोलवल्यावर जात होता. रेल्वे स्थानकावरच मिळेल ते खाऊन तेथेच झोपत होता. बुधवारी रात्री गेवराई ब्रुकबाँड येथून ट्रकमध्ये सिमेंट भरून देवळाईतील खडी रोडवर उतरवले होते. त्यानंतर दोन मित्रांसह दारू पिऊन रेल्वे स्थानकावर झोपण्यासाठी गेला. ९ ऑगस्ट रोजी डोक्यात वार करून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले.
सबळ पुराव्यानिशी मध्य प्रदेश गाठले
रेल्वे स्थानकात सध्या विकासकामे सुरू असल्याने अनेक सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे फुटेज नसल्याने आरोपीला शोधणे लोहमार्ग पोलिसांसमोर आव्हान होते. अधीक्षक स्वामी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जोगदंड, सहायक निरीक्षक गणेश दळवी, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, चंदन साकला, प्रीत फड यांनी शोध सुरू केला. रेल्वे स्थानकावरील अन्य हमालांची चौकशी केली. खून केल्यानंतर अनिल पळून गेल्याचे निष्पन्न हाेताच पथकाने त्याच्या हर्सुद खलवा गावात जाऊन मुसक्या आवळल्या. अंमलदार संजय भेंडेकर, राहुल गायकवाड, प्रमोद जाधव, अनिल वाघमारे, प्रवीण धाडवे यांनी कारवाई पार पाडली.