'ब्लेम गेम बंद करा',क्रांती चौक उड्डाणपूलाच्या दुरुस्तीवरून हायकोर्टाने तिन्ही विभागांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 12:20 PM2022-01-06T12:20:55+5:302022-01-06T12:24:40+5:30

रस्ते महामंडळ, सा. बां. विभाग आणि मनपाला त्वरित तोडग्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत

Close Blame Game, High Court slams AMC, PWD,MSRDC for repairing Kranti Chowk flyover | 'ब्लेम गेम बंद करा',क्रांती चौक उड्डाणपूलाच्या दुरुस्तीवरून हायकोर्टाने तिन्ही विभागांना फटकारले

'ब्लेम गेम बंद करा',क्रांती चौक उड्डाणपूलाच्या दुरुस्तीवरून हायकोर्टाने तिन्ही विभागांना फटकारले

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबादेतील क्रांती चौकामधील उड्डाण पुलाच्या देखभाल व दुरुस्तीबाबत परस्परांकडे बोट दाखवू नका. (ब्लेम गेम बंद करा) नेमकी जबाबदारी कोणाची; या वादावर त्वरित तोडगा काढा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. दिगे यांनी बुधवारी रस्ते महामंडळ, मनपा आणि सा. बां.ला दिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.सुनावणीवेळी वरील तिन्ही विभाग पुलाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी झटकून परस्परांकडे बोट दाखवू लागले असता खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

क्रांती चौकामधील उड्डाण पुलावर आरपार फट पडली असून, त्यामुळे मोठी हानी होऊ शकते, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने ३ जानेवारीला छायाचित्रासह छापले होते. शहरातील रस्ते व उड्डाणपुलांच्या दुरवस्थेबाबत जनहित याचिका दाखल केलेेले ॲड. रूपेश जैस्वाल यांनी पाहणी केली. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या फटी पडल्याबाबत ॲड. जैस्वाल यांनी दिवाणी अर्ज दाखल करून ही बाब मंगळवारी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती.

क्रांती चौकातील उड्डाणपूल रस्ते महामंडळाने २०१७ ला बांधून मनपा सा. बां. विभागाकडे हस्तांतरित केला होता. तो शहरातील सर्वाधिक रहदारीचा पूल असून, या पुलावरून दररोज सरासरी १० हजार वाहने ये-जा करतात. संभाव्य अपघात व हानी टाळण्यासाठी पुलाची दुरुस्ती तत्काळ होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने जीवित हानी घडल्यास अथवा अपघातात कोणी अवयव गमावले तर ते आर्थिक भरपाईने भरून निघू शकत नाही. त्वरित पुलाची दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यावेत, तोपर्यंत रहदारी इतरत्र वळवावी, अशी विनंती ॲड. जैस्वाल यांनी केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणी दरम्यान प्रतिवादी जबाबदारीची टोलवाटोलवी करीत असल्यामुळे खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले.

Web Title: Close Blame Game, High Court slams AMC, PWD,MSRDC for repairing Kranti Chowk flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.