गॅस सिलिंडरसाठी अजूनही भर उन्हात नागरिकांच्या रांगा; ओटीपीचा तिढा, घरात चुलीचे ठाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:33 IST2026-04-07T18:33:19+5:302026-04-07T18:33:44+5:30

अनेक कुटुंबांवर १५ ते २० दिवसांपासून चूल पेटवण्याची वेळ

Citizens still queue in the heat for gas cylinders; OTP issue, stoves at home | गॅस सिलिंडरसाठी अजूनही भर उन्हात नागरिकांच्या रांगा; ओटीपीचा तिढा, घरात चुलीचे ठाण

गॅस सिलिंडरसाठी अजूनही भर उन्हात नागरिकांच्या रांगा; ओटीपीचा तिढा, घरात चुलीचे ठाण

छत्रपती संभाजीनगर : शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरणासाठी आता १०० टक्के 'ओटीपी' सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, या नव्या नियमामुळे आणि होम डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या विलंबामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून, गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांवर गेल्या १५ ते २० दिवसांपासून चूल पेटविण्याची वेळ आली आहे.

एपीआय कॉर्नर येथील भवानी गॅस एजन्सीसमोर दुपारी १२ वाजेच्या रणरणत्या उन्हात गॅससाठी नागरिकांनी मोठी रांग लावली होती. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध गॅस एजन्सीबाहेर हे विदारक चित्र पाहायला मिळाले. या रांगेत महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश होता. ज्या ग्राहकांनी अगोदरच गॅसचे ऑनलाइन बुकिंग केले होते, त्यांना रांगेत न उभे राहता थेट सिलिंडर मिळत होता. मात्र, इतरांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागत होते. शहरातील इतर काही गॅस एजन्सीवर गर्दी नसली तरी, प्रमुख एजन्सीबाहेर मात्र ग्राहकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. एका एजन्सीने तर ग्राहकांसाठी उन्हात कूलरची व्यवस्था केली होती.

चुलीवर स्वयंपाक
राजनगराहून आलेले दिलीप मोरे हे जवळपास एक ते दीड तास रांगेत उभे होते. मात्र, नंबर आल्यावर त्यांना १० एप्रिलला या, असे सांगण्यात आले. आपली व्यथा मांडताना ते म्हणाले, गेल्या १५ दिवसांपासून गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या आमच्या घरी चुलीवर स्वयंपाक सुरू असून, सिलिंडर मिळविण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. मंगेश गॅस एजन्सीच्या बाहेर पिसादेवीवरून आलेल्या वृद्ध महिला जिजाबाई मगरे या गॅससाठी ताटकळत उभ्या होत्या. गॅस नसल्याने त्यांच्याही घरी गेल्या महिन्याभरापासून चुलीवरच स्वयंपाक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

'ओटीपी'चा तिढा
डिलिव्हरी करणारी मुले एका दिवसात ५० जणांनाही घरपोच सिलिंडर देऊ शकतात. परंतु, 'ओटीपी' सक्तीमुळे मोठ्या अडचणी येत आहेत. गॅस कनेक्शनला बहुतांश घरातील कर्त्या पुरुषांचे मोबाइल नंबर जोडलेले आहेत. हे पुरुष कामाच्या निमित्ताने घराबाहेर असतात आणि घरात केवळ वृद्ध किंवा महिला असतात. डिलिव्हरी बॉय घरी गेल्यावर वेळेवर ओटीपी न मिळाल्याने सिलिंडर देता येत नाही. परिणामी, नाइलाजाने अनेक ग्राहकांना थेट एजन्सीवर धाव घ्यावी लागत आहे.
- मंगेश आसवार, पदाधिकारी, एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन

Web Title : ओटीपी की समस्या के बीच गैस सिलेंडर के लिए नागरिकों की कतारें, चूल्हे का सहारा।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में अनिवार्य ओटीपी और डिलीवरी में देरी के कारण नागरिकों को गैस सिलेंडर के लिए लंबी कतारों का सामना करना पड़ रहा है। कई परिवार गैस की कमी और ओटीपी सत्यापन की समस्याओं के कारण पारंपरिक चूल्हों पर खाना बनाने को मजबूर हैं, जिससे विशेष रूप से बुजुर्ग और महिलाएं प्रभावित हैं।

Web Title : Citizens queue for gas cylinders amidst OTP issues, revert to stoves.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar citizens face long queues for gas cylinders due to mandatory OTP and delivery delays. Many families are forced to cook on traditional stoves due to gas shortages and OTP verification problems, particularly affecting elderly and women.