छत्रपती संभाजीनगर : १०० रुपयांच्या बॉन्ड पेपरवर लेखी करारनामा करून ‘दत्तक’ म्हणून विकत घेतलेल्या मुलांना भीक मागण्यासाठी बेदम मारहाण करून, भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या जनाबाई उत्तम जाधव (५९) आणि सविता संतोष पगारे (३३, दोघी रा. रामनगर, मुकुंदवाडी) या ‘माय-लेकी’ ला अतिरिक्त सत्र न्यायाधीश साबिना मलिक यांनी शुक्रवारी (दि.९) सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.
असे फुटले ‘बिंग’संजयनगर मुकुंदवाडीतील देवराज नाथाजी वीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांच्या नातेवाईक महिलेने फोन करून त्यांना माहिती दिली की, रामनगर येथील जनाबाई जाधव व तिची मुलगी सविता पगारे या दोघी त्यांच्या सोबतच्या मुलाला लाकडी लाटण्याने बेदम मारहाण करीत आहेत. फिर्यादीने मुलाला महिलांच्या ताब्यातून वेगळे केले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही महिलांसह सदर मुलाला पोलिस ठाण्यात नेले. तेथे बाल सरंक्षण कक्षाच्या अधिकारी ॲड. सुप्रिया इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलाची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, ‘आरोपी महिलांनी त्याला भीक मागण्यासाठी आणले आहे. भीक मागण्यास नकार दिल्यास त्या मारहाण करतात’.
महिलांवर गुन्हासमितीच्या अधिकाऱ्यांनी सविता पगारे हिची चौकशी केली असता, तिने सांगितले की, मुलाला त्याच्या आई-वडिलांकडून ५५ हजारांना विकत घेतले आहे, तसेच जालन्यातील २ वर्षांच्या मुलालादेखील त्याच्या आई-वडिलांकडून एक लाख रुपयांत दत्तक म्हणून विकत घेतले आहे. तसा शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर लेखी करारनामा देखील असल्याचे सविताने सांगितले. याबाबत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनावणी व शिक्षातत्कालीन उपनिरीक्षक श्रीकांत भराटे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी वकील सचिन सूर्यवंशी यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी जनाबाई हिला विविध कलमांखाली एक वर्षाची सक्तमजुरी आणि सविता हिला ३ वर्षांची सक्तमजुरी आणि दोघींना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.