उद्योजक लड्डा यांचा बालमित्रानेच केला घात; दरोडा प्रकरणाची उकल, आणखी चार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:23 IST2025-05-31T15:19:30+5:302025-05-31T15:23:20+5:30

आतापर्यंत दहा आरोपी अटकेत, मात्र साडेपाच किलो सोने आणि ३० किलो चांदीचा शोध लागला नाही

childhood friend evolve in Ladda Robbery Case: Four more people arrested in the Ladda robbery case in Chhatrapati Sambhajinagar | उद्योजक लड्डा यांचा बालमित्रानेच केला घात; दरोडा प्रकरणाची उकल, आणखी चार अटकेत

उद्योजक लड्डा यांचा बालमित्रानेच केला घात; दरोडा प्रकरणाची उकल, आणखी चार अटकेत

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या कटाची संपूर्ण उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, लड्डा यांच्या घरातील रोकड, दागिन्यांची माहिती देणारा त्यांचा बालमित्रच निघाला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, दरोड्यातील साडेपाच किलो सोने आणि ३० किलो चांदीचा अद्याप तपास लागला नाही.

१५ मे रोजी वाळूज येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर धाडसी दरोडा पडला होता. यात तब्बल साडेपाच किलो सोने, ३० किलो चांदी आणि रोकड चोरीस गेली. शहरातील सर्वात मोठा दरोडा ठरल्याने पोलिसांनी काटेकोर तपास केला. पाच दरोडेखोर ताब्यात घेतल्यानंतर अमोल खोतकर या दरोडेखोराचे पोलिसांनी एन्काउंटर केले. त्यानंतर पोलिस तपासात दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. उद्योजक लड्डा यांच्या घरातील संपत्तीविषयी वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्कूलबस चालक देवीदास नाना शिंदे (४५) याने माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे शुक्रवारी उघड झाले. शिंदे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांना आणखी तिघांची माहिती मिळाली. यावरून आज बाळसाहेब चंद्रकांत इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे या चार जणांना ताब्यात घेत संपूर्ण दरोडा प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिंदे पर्यन्त माहिती कशी आली? 
देवीदास शिंदे वाळूजमधीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसवर चालक आहे. त्याला महेश गोराडे याने लड्डा यांच्या संपत्तीबद्दल माहिती दिल्याचे उघड झाले. अधिक तपास केला असता महेशला गणेश गोराडे याने माहिती दिली होती. तर गणेशला याची माहिती आदिनाथ जाधव याने दिल्याचे उघड झाले. तर जाधव याला लड्डा यांचा मित्र बाळासाहेब इंगोले याने माहिती दिल्याचे अधिक तपासातून स्पष्ट झाल्याने लड्डा दरोडा प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला.

बालमित्रच निघाला घरभेदी
मात्र लड्डा यांच्या घरातील नेमकी माहिती दरोडेखोरांना होती असे लक्षात आल्याने यात जवळचा कोणीतरी गुंतल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास करत होते. यातून लड्डा यांचा बालमित्र बाळासाहेब इंगोलेचे नाव पुढे आले. 
इंगोले याला लड्डा यांनी स्वतःच्या कंपनीत कटींग इन चार्ज म्हणून नोकरी दिली होती. बालमित्र असल्याने इंगोलेचा लड्डा यांच्या घरात सहज वावर होता. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी लड्डा आणि इंगोले यांच्या कामाच्या ठिकाणी वर्तवणुकीवरून वाद झाला. यातून इंगोले याने लड्डा यांना धडा शिकवायचे ठरवले. मित्र लड्डा यांच्या सर्व संपत्तीची माहिती इंगोले याला होती. यातूनच इंगोले याने आदिनाथ जाधव याला याची माहिती दिली. यानंतर गणेश गोराडे, महेश गोराडे, देविदास शिंदे अशी माहिती पुढे जात हाजबे आणि खोतकर यांचेपर्यंत पोहचली. यानंतरच शहरातील सर्वात मोठ्या दारोदयचे नियोजन हाजबेच्या हॉटेलवर ठरले.

हे आरोपी अटकेत
दरोड्यातील प्रमुख सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव) याचे गुन्हे शाखेने ‘एन्काउंटर’ केले, तर त्याचे साथीदार याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी), सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी), महेंद्र माधव बिडवे (३८, रा. साजापूर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. अंबाजोगाई), सोहेल जलील शेख (२२, रा. अंबाजोगाई) ही सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यानंतर शुक्रवारी देविदास शिंदे तर आज बाळासाहेब इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: childhood friend evolve in Ladda Robbery Case: Four more people arrested in the Ladda robbery case in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.