मुख्यमंत्र्यांना १२०० पोलिसांचे असणार सुरक्षा कवच; तीन डीसीपी उतरणार फिल्डवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 16:41 IST2022-07-30T16:39:57+5:302022-07-30T16:41:56+5:30
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निश्चित असे ठिकाण ठरविण्यात आले असून त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांना १२०० पोलिसांचे असणार सुरक्षा कवच; तीन डीसीपी उतरणार फिल्डवर
औरंगाबाद : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर शनिवारी सायंकाळी येत आहेत. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असणार असून, तब्बल १२०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय तीन पोलीस उपायुक्तांसह सहायक आयुक्त, निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जांचे अधिकारीही सोबत असणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.
आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा दौरा प्राप्त झालेला आहे. शहरातील अनेक ठिकाणी मुख्यमंत्री महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्याशिवाय काही लोकप्रतिनिधींच्या भेटी घेणार आहेत. एका ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत असणारी सुरक्षा व्यवस्था आणि ते ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी लावण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था स्वतंत्र असणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून जाणार आहेत त्या मार्गावरही कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
पोलीस सुरक्षेसाठी निश्चित असे ठिकाण ठरविण्यात येत आहे. त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात येईल. त्याशिवाय पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, दीपक गिऱ्हे हे प्रत्यक्ष फिल्डवर असणार आहेत. त्यांनाही ठिकाणे नेमून दिली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कोठेही कमतरता राहणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचेही आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले.