छत्रपती संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या दरोड्याचा उलगडा; पाच जण ताब्यात, दीड किलो सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:31 IST2025-05-26T12:31:30+5:302025-05-26T12:31:56+5:30
मास्टरमाइंडसह आणखी तिघे जण फरार असून गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे

छत्रपती संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या दरोड्याचा उलगडा; पाच जण ताब्यात, दीड किलो सोने जप्त
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याचा गुन्हे शाखा पोलिसांनी ११ दिवसांत छडा लावला. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये एका हॉटेल चालकाचा सहभाग निष्पन्न झाल्यावर त्यालाही उचलले. या गुन्ह्यात पावणे दोन किलो सोने-चांदीचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण मास्टरमाइंडसह आणखी तिघे जण सापडलेले नाहीत.
उद्योजक लड्डा हे ७ मे रोजी कुटुंबीयांसह अमेरिकेला गेले होते. १९ वर्षांपासूनचा विश्वासू कामगार संजय झळके (रा. वळदगाव) याला केअरटेकर म्हणून बंगल्यावर ठेवले होते. १५ मे रोजी पहाटे २ ते ४ वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर बंगल्यातून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी, असा ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. दहा दिवसांपासून गुन्हे शाखेचे ७ आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील २, अशी ९ पथके तपास करीत होती. या पथकांनी दरोड्याचा छडा लावला असून, वडगाव कोल्हाटीत एकाला उचलले. त्याच्याकडून दीड किलो सोने जप्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. अधिक तपशील पोलिसांनी दिला नाही.
तपासावरून पोलिसांमध्ये गटबाजी
या गुन्ह्याच्या तपासावरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा यांच्यात गटबाजी दिसून आली. सुरुवातीला तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांकडे होता. दुसऱ्याच दिवशी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यानंतर पोलिस ठाण्याकडून गुन्हे शाखेला सहकार्य मिळाले नाही. त्यातच गुन्हे शाखेकडूनही एमआयडीसी वाळूज पोलिसांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुन्ह्याची उकल होण्यास उशीर झाल्याचे समोर आले आहे.