नवोदय परीक्षेत जिल्हा परिषद शाळांचा डंका! ६० पैकी ४४ जागांवर ग्रामीण विद्यार्थ्यांची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 20:07 IST2026-03-19T20:06:21+5:302026-03-19T20:07:13+5:30
जि.प. शाळांचे विद्यार्थी 'लय हुशार'; नवोदय प्रवेश परीक्षेत ७५% यश, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची माहिती

नवोदय परीक्षेत जिल्हा परिषद शाळांचा डंका! ६० पैकी ४४ जागांवर ग्रामीण विद्यार्थ्यांची बाजी
- राम शिनगारे
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. ग्रामीण भागासाठी राखीव असलेल्या ६० जागांपैकी तब्बल ४४ जागांवर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा जि.प.चे विद्यार्थी ‘लय हुशार’ असल्याचा प्रत्यय आला.
केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी १३ डिसेंबर २०२५ रोजी ५२ केंद्रांवर परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १९ हजार ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. १७ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ८० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ६० जागा तर शहरीसाठी २० जागा राखीव होत्या. ग्रामीणच्या राखीव ६० जागांपैकी तब्बल ४४ जागा जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना पटकावल्या. टक्केवारीत जवळपास ७५ टक्के विद्यार्थी जि.प.चे असल्याचेही शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यात ३ हजार ४५ शाळा
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ३ हजार ४५ शाळा आहेत. त्यातील २ हजार ९० शाळा जि.प.च्या आहेत. या शाळांमधील १९ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेसाठी अर्ज केला होता. नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची निवासी व मोफत शाळा असून, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी मानली जाते.
‘एनएमएमएस’ परीक्षेनंतर नवोदयमध्ये यश
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत जिल्ह्यातून १ हजार ३१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ९२५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ९वी ते १२वी पर्यंत प्रतिवर्ष १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. तर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण संपूर्णपणे मोफत मिळते.
नवोदयमध्ये जि.प. विद्यार्थ्यांचा चढता आलेख
शैक्षणिक वर्ष..................निवड झालेले विद्यार्थी
२०२२-२३..................................१४
२०२३-२४..................................२०
२०२४-२५...................................३४
२०२५-२६....................................४४
तालुकानिहाय निवड झालेले विद्यार्थी
तालुका..........................विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर................२
सिल्लोड..........................९
सोयगाव.........................३
पैठण.............................७
वैजापूर..........................१०
गंगापूर..........................७
फुलंब्री..........................२
कन्नड...........................४
------------------------------------
एकूण...........................४४
जि.प. शाळांमधील शिक्षक, अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. मागील चार वर्षांपासून गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे नवोदय परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
-जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक