आमदारासाठी कसले नियम? विलास भुमरेंनी मुलाला थेट EVM जवळ नेलं; बोटाला शाईही लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:09 IST2026-02-07T14:09:03+5:302026-02-07T14:09:24+5:30
आमदाराच्या मुलानेही दाबलं EVM चं बटण? पाचोडमधील व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ.;जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

आमदारासाठी कसले नियम? विलास भुमरेंनी मुलाला थेट EVM जवळ नेलं; बोटाला शाईही लावली
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या लहान मुलासह मतदान केंद्रात प्रवेश करून नव्या वादाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, भुमरे यांनी मुलाला केवळ मतदान यंत्राजवळ नेलेच नाही, तर तेथील कर्मचाऱ्याकडून मुलाच्या बोटाला शाईदेखील लावून घेतली. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीचे आदेश दिले असून केंद्राध्यक्षांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
नेमका प्रकार काय? पाचोड जिल्हा परिषद गटात आमदार भुमरे यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे निवडणूक लढवत आहेत. या गटात मतदानासाठी गेलेल्या विलास भुमरे यांनी आपल्या चिमुकल्या मुलाला सोबत नेले होते. मतदान करताना त्यांनी मुलाला ईव्हीएम मशीन जवळ उभे केले. त्यानंतर वडिलांच्या बोटाला शाई लावत असल्याचे पाहून मुलानेही बोट पुढे केले आणि तेथील महिला कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन करत मुलाला शाई लावली.
खासदार भुमरेंची 'अजब' प्रतिक्रिया
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून टीका होत असताना, खासदार संदीपान भुमरे यांनी मात्र हात झटकले आहेत. "ते लहान लेकरू आहे, मी तिथे नव्हतो, मला याबद्दल काहीही माहिती नाही," अशी अजब प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र, निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाला जाब विचारला आहे.
कारवाईचा बडगा
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, "हा प्रकार अतिशय गंभीर आहे. मतदान केंद्रातील गोपनीयतेचा आणि नियमांचा भंग झाला आहे. या घटनेची पूर्ण चौकशी करून कारवाई केली जाईल."