लाडसावंगी गटात चार उमेदवार परस्परांचे नातलग; पाहुण्यारावळ्यांची मतेच निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:05 IST2026-02-06T16:04:11+5:302026-02-06T16:05:09+5:30
छत्रपती संभाजीनगरमधील लक्षवेधी लढत: उमेदवारांना मतदान करण्यासाठी दररोज दहा-बारा फोन पाहुण्यारावळ्यांकडून येत आहेत. आपल्या पाहुण्यांना मतदान करा, असे सांगितले जात आहे.

लाडसावंगी गटात चार उमेदवार परस्परांचे नातलग; पाहुण्यारावळ्यांची मतेच निर्णायक
लाडसावंगी (छत्रपती संभाजीनगर) : गटातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक रंगतदार टप्प्यावर आहे. नात्यागोत्यातील मतदारांचा कल ज्या उमेदवारांच्या पारड्यात जाईल, तोच उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय आरोप - प्रत्यारोपांमुळे या गटातील प्रचाराकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लाडसावंगी गट हा सर्वसाधारण सुटला होता. शिवाय छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बहुतांश गट आरक्षित झाल्याने तालुक्यातील मातब्बर नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे हे लाडसावंगी गटात भाजपकडून इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने आ. अनुराधा चव्हाण यांच्यावर आरोप करत त्यांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. शिवाय लाडसावंगी गटातील भाजपचे उमेदवार विजय काळे, काॅंग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पठाडे, राष्ट्रवादी (अजित पवार)चे उमेदवार बाबासाहेब म्हस्के हे चारही उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र यात ज्यांच्या पारड्यात नातेवाईकांचे मतदान जाईल, तोच उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
प्रचार थंडावला मात्र...
गुरुवारी प्रचार संपला असला तरी आता प्रत्यक्ष भेटींवर भर दिला जाणार आहे. अनेक मतदारांना आता लक्ष्मी दर्शन होईल का? अशी आस लागलेली आहे. लाडसावंगी गटात एकूण ३२,१३० मतदार असून, यात १६,९९५ पुरुष तर १५,१३५ महिला मतदार आहेत.
एरव्ही कधी ख्यालीखुशाली विचारली का?
उमेदवारांना मतदान करण्यासाठी दररोज दहा-बारा फोन पाहुण्यारावळ्यांकडून येत आहेत. आपल्या पाहुण्यांना मतदान करा, असे सांगितले जात आहे. एरव्ही कधीही फोन आला नाही. आता मात्र पहिले ख्यालीखुशाली विचारायची, नंतर मतदान करा म्हणून सांगायचे, असे प्रकार सुरू आहेत. पाहुण्यांच्या फोनचा वैताग आल्याचे अनेक मतदारांनी सांगितले.