छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिंदेसेना ठरली 'मोठा भाऊ', भाजपचीही दमदार कामगिरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:32 IST2026-02-09T19:31:29+5:302026-02-09T19:32:17+5:30
महायुतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद खिशात घातली; मविआचा सुपडा साफ

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिंदेसेना ठरली 'मोठा भाऊ', भाजपचीही दमदार कामगिरी!
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या ६३ जागांसाठी झालेल्या रणधुमाळीचा निकाल जाहीर झाला असून, ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. शिंदेसेनेने २४ जागांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, भाजपने २२ जागांवर विजय मिळवत त्यांना भक्कम साथ दिली आहे. या निकालामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महाविकास आघाडीला मोठा राजकीय हादरा बसला आहे.
कुठे जल्लोष, कुठे धक्कादायक पराभव!
या निवडणुकीत सर्वात मोठा विजय पैठण आणि सिल्लोड तालुक्यात पाहायला मिळाला. पैठणमध्ये खासदार संदिपान भूमरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने ९ पैकी ८ जागा जिंकून विरोधकांचे पानिपत केले. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या चिरंजीवांसह ६ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
माजी आमदारांना धक्का
मात्र, दुसरीकडे दोन माजी आमदारांच्या पत्नींना पराभवाचा धक्का बसला आहे. उदयसिंग राजपूत आणि संजय वाघचौरे यांच्या पत्नींचा पराभव हा या निवडणुकीतील सर्वात मोठा 'अपसेट' मानला जात आहे.
घराणेशाहीची सरशी, आमदारांची धाकधूक
निवडणुकीत अनेक नेत्यांच्या वारसांनी आपली ताकद दाखवली. अब्दुल आमेर, शिवराज भूमरे, निखिल चव्हाण आणि मीनाक्षी पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. आमदार प्रशांत बंब आणि अनुराधा चव्हाण यांनी आपले बालेकिल्ले सुरक्षित राखले असले, तरी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आणि कन्नडच्या आमदार संजना जाधव यांना मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही.
जिल्हा परिषदेतील अंतिम पक्षीय बलाबल (एकूण ६३ जागा):
शिवसेना (शिंदे): २४ (१ पुरस्कृत)
भाजप: २२ (१ पुरस्कृत)
उद्धवसेना: ०९
राष्ट्रवादी (अजित पवार): ०४
काँग्रेस / राष्ट्रवादी (श.प.) / प्रहार / अपक्ष: प्रत्येकी ०१ जागा
मागच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल:
भाजप- २३,
एकत्र शिवसेना- १८,
काँग्रेस- १६,
एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस- ३,
अपक्ष- २,
एकूण ६२