पैठणचा रणसंग्राम: भुमरे पिता–पुत्रांचे वर्चस्व मोडणार की पुन्हा सत्ता? भाजपपुरस्कृत अपक्ष अन् विरोधकांचे तगडे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:50 IST2026-02-05T19:49:47+5:302026-02-05T19:50:22+5:30
चितेगावसह मोठ्या गटांत काट्याची लढत

पैठणचा रणसंग्राम: भुमरे पिता–पुत्रांचे वर्चस्व मोडणार की पुन्हा सत्ता? भाजपपुरस्कृत अपक्ष अन् विरोधकांचे तगडे आव्हान
- अनिलकुमार मेहेत्रे
पैठण : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची लढत न राहता, सत्तेची आणि प्रतिष्ठेची एक मोठी कसोटी ठरली आहे. शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे या पिता-पुत्रांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असतानाच, भाजपच्या आक्रमक भूमिकेने या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण केली आहे.
तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक होत आहे. पैठणमध्ये सध्या सर्वच सत्ताकेंद्रांवर भुमरे पिता-पुत्रांचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या पैठण नगरपरिषदेच्या निवडणुकीतील शिंदेसेनेने एकहाती सत्ता संपादन करून विरोधकांचे पानिपत केले. असे असताना भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी भुमरे पिता-पुत्रांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसचे अनिल पटेल, राष्ट्रवादी (शरद पवार) चे माजी आमदार संजय वाघचौरे, भाजपचे दत्ता गोर्डे, उद्धवसेनेचे सचिन घायाळ आणि सुनील शिंदे यांनी 'सत्ता विरुद्ध जनभावना' असा पवित्रा घेत तगडे आव्हान उभे केले आहे. विशेषतः चितेगाव, बिडकीन, पाचोड, आडूळ आणि ढोरकीन या मोठ्या गटांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची नगर पालिका निवडणुकीत वाताहत झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिल्लोड वगळता इतरत्र भाजप-शिंदेसेनेची युती असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु समाधानकारक जागा मिळाल्या नसल्याने शेवटच्या क्षणी भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केले होते; परंतु शिंदेसेनेच्या आक्षेपानंतर वेळेत पक्षाचे बी फाॅर्म दिले नाही, म्हणून भाजपच्या सर्व उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली. आता भाजपपुरस्कृत हा अपक्ष उमेदवार काही जादू करणार की भुुमरे पिता-पुत्र त्यांना कात्रजचा घाट दाखवणार हे निवडणूक निकालांती स्पष्ट होणार आहे.
प्रचाराचा शेवटचा टप्पा
उमेदवारांनी आता कॉर्नर बैठका, पदयात्रा आणि थेट घरभेटींवर भर दिला आहे. ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असून, पैठणच्या राजकारणात भुमरे पिता-पुत्रांचे नेतृत्व अधिक बळकट होणार की भाजप पुरस्कृत अपक्ष आणि विरोधक नवी समीकरणे मांडणार, याचा फैसला होणार आहे.