छत्रपती संभाजीनगर हादरले; दाम्पत्यावर घरात घुसून गोळीबार, सुदैवाने दोघेही बचावले
By सुमित डोळे | Updated: July 31, 2023 18:30 IST2023-07-31T18:29:28+5:302023-07-31T18:30:39+5:30
प्रसंगावधान राखून खाली बसल्याने वाचले प्राण

छत्रपती संभाजीनगर हादरले; दाम्पत्यावर घरात घुसून गोळीबार, सुदैवाने दोघेही बचावले
छत्रपती संभाजीनगर : एका दाम्पत्यावर घरात घुसून गोळीबार केल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान हनुमाननगर गल्ली नंबर ५ येथे घडल्याने शहर हादरले. प्रभू आनंद अहिरे( ६१ ) आणि त्यांची पत्नी या हल्ल्यात थोडक्यात बचावले.
मनपात सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रभू अहिरे हे पत्नीसह नुकतेच हनुमान नगर येथे राहण्यास आले आहेत. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ते पत्नीसह घरात स्वयंपाकाची तयारी करत करत होते. त्यावेळी घराचा दरवाजा उघडाच होता. अचानक चेहऱ्यास रुमाल बांधलेल्या दोघांनी घरात प्रवेश केला. काही कळायच्या आता एकाने अहिरे यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. प्रभू अहिरे प्रसंगावधान राखून खाली बसले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. तेवढ्यात आणखी एक गोळी धाडली त्यातूनही दाम्पत्य बचावले. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून पसार झाले. विशेष म्हणजे, हल्लेखोर चालत आले होते. गोळीबारनंतर दोघेही त्याच मार्गे पसार झाले.
माहिती मिळताच, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील, पोनी व्यंकटेश केंद्रे, राजश्री आडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात दोन्ही बुलेट आढळून आल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत.