दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:12 IST2025-04-19T15:11:44+5:302025-04-19T15:12:38+5:30
मृताच्या नातेवाइकांनी एकावर संशय व्यक्त केला असून पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना

दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
छत्रपती संभाजीनगर : शहरातील बायजीपुरा परिसरात आज सकाळी दुहेरी हत्येची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सलमान खान आरेफ खान (३०) आणि त्याचा साला सुलतान शेख (१७) अशी मृतांची नावे आहेत. दुचाकीच्या वादातून त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा संशय असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
फिर्यादी इम्रान खान आरेफ खान (२१) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजेच्या सुमारास चंपा चौकात असताना त्याच्या चुलत भावाने सांगितले की, त्याचा भाऊ सलमान व सुलतान यांच्यावर गल्लीत हल्ला झाला असून सलमान जागीच ठार झाला आहे आणि सुलतान उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेत असताना मरण पावला. इम्रान आणि त्याची पत्नी घटनास्थळी पोहोचले असता पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी मृत व्यक्ती हा त्यांचा सख्खा भाऊ सलमान असल्याचे सांगितले. घटनास्थळी मृतदेहाजवळ मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते व सलमानचा चेहरा ठेचलेला असल्याचे आढळले. सुलतानवरही गंभीर हल्ला करण्यात आला होता.
फिर्यादीच्या काकाच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२.३० वाजेच्या सुमारास शेख आसिफ शेख हाफिज (रा. सिल्लोड) याचा फोन आला होता. त्याने सुलतानने त्याची दुचाकी परत केली नसल्याचा राग व्यक्त केला होता. पोलिस वारंवार त्याच्या घरी येत असल्याने तो सुलतानला सोडणार नसल्याची धमकीही दिली होती. या माहितीवरून इम्रान खान यांनी शेख आसिफ याच्यावर दोघांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.