'दरफलक वर अन् लूट खाली!'; छ. संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर 'पे अँड युज'चा अजब कारभार, प्रवाशांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:28 IST2026-03-20T19:27:51+5:302026-03-20T19:28:31+5:30
दिसणार नाही असा ‘पे अँड यूज’चा दरफलक; अतिरिक्त वसुली करून रेल्वे प्रवाशांची सर्रास लूट

'दरफलक वर अन् लूट खाली!'; छ. संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर 'पे अँड युज'चा अजब कारभार, प्रवाशांची लूट
छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्थानकावरील ‘पे ॲण्ड यूज’ स्वच्छतागृहात एक वेगळाच ‘खेळ’ सुरू आहे. येथे शुल्काचा अधिकृत फलक इतक्या उंचीवर आणि आडवळणाच्या ठिकाणी लावण्यात आला आहे की, तो पाहण्यासाठी प्रवाशांना मान वर करून शोधमोहीमच करावी लागते. परिणामी, ‘दर माहिती नाही’ या परिस्थितीचा फायदा घेत अधिक पैसे लाटण्याचा प्रकार बिनधास्त सुरू आहे.
स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ स्पष्टपणे दिसणारा दरफलक असणे अपेक्षित असताना, येथे तो भिंतीच्या वर अगदी छताजवळ लावलेला दिसतो. त्यावरील अक्षरेही अगदी बारीक आहेत. गडबडीत असलेले प्रवासी, महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, कोणीही त्या फलकाकडे लक्ष देत नाही आणि याच क्षणाचा फायदा घेत नियमापेक्षा जास्त शुल्क आकारले जाते.
‘दिसत नाही, म्हणून चालतं’चा फंडा
ही केवळ दुर्लक्षाची बाब नसून, जाणूनबुजून आखलेली युक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फलक दिसला नाही, तर प्रश्नच येत नाही, या तत्त्वावर हा कारभार सुरू असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे.
कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ
या ठिकाणी दर विचारल्यावर कर्मचाऱ्यांकडून ठोस उत्तर मिळत नाही. ‘इथे एवढेच लागतात’ असे सांगून अधिक पैसे घेतले जातात. फलक दाखवण्याची मागणी केल्यास टाळाटाळ केली जाते.
नियम कुठे हरवले?
रेल्वेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दरफलक ठळक आणि सहज दिसेल अशा ठिकाणी असणे बंधनकारक आहे. मात्र, येथे नियमांनाच ‘वर’ लटकवून ठेवण्यात आल्याचे चित्र दिसते. याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता, संबंधित स्वच्छतागृह चालकाला सूचना केली जाईल, असे सांगण्यात आले.
स्वच्छतागृहाचे अधिकृत शुल्क
- बाथरूम व शौचालय : १० रु.
- शौचालय : ५ रु.
- लघुशंका (युरिन) : ३ रु.