नायलॉन मांजा पुरवठादारांच्या शोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांची पथके गुजरातमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:09 IST2025-12-16T15:09:06+5:302025-12-16T15:09:06+5:30
आजपर्यंत १२ आरोपींकडून सुमारे १ हजार नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले

नायलॉन मांजा पुरवठादारांच्या शोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांची पथके गुजरातमध्ये दाखल
छत्रपती संभाजीनगर : पतंग उडविण्यासाठी जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर करण्यात येत आहे. त्याविरोधात धडक मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. नायलॉन मांजा विरोधातील मोहिमेत आतापर्यंत पोलिसांनी १ हजार मांजाचे गट्टू जप्त केले. त्याशिवाय १२ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरातमधील सुरतमधून मांजाची तस्करी करण्यात येत आहे. या मांजाचा पुरवठा करणाऱ्यांच्या शोधात दोन पथके गुजरातमधील सुरतमध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
नायलॉन मांजामुळे पशुपक्षांसह मानवी जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाच्या २०२३ च्या बंदी अधिसूचनेनुसार मांजा बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका, नगरपरिषद, जिल्हा प्रशासन, महसूल, जिल्हा परिषद, पोलिस, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन व आरोग्य विभागावर सोपवलेली आहे. मात्र, पोलिस वगळता अन्य एकाही विभागाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पोलिस दलाने पावले उचलत १२ आरोपींना अटक केली असून, तब्बल एक हजार मांजा गट्टू जप्त केले आहेत.
बोगस नाव व मोबाईल क्रमांकाचा वापर...
मांजाची विक्री करणाऱ्या भावंडांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर आता बोगस नाव आणि सीमकार्डचा वापर करून गुजरातच्या सुरत येथून मांजाचे पार्सल मागविल्याप्रकरणी सप्लायरच्या शोधात गुन्हे शाखेची एक आणि सिटी चौक अशी दोन पथके गुजरातच्या सुरत येथे गेली असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले. दरम्यान, सेंट्रल नाका भागात ३ वर्षांचा चिमुकला गळ्याला मांजा लागून जखमी झाल्यानंतर ७ डिसेंबर पासून विक्रेत्यांच्या गळ्याभोवती फास आवळणे सुरु केले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत १२ आरोपींकडून सुमारे १ हजार नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले.