छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे टार्गेट 'नशेखोर' आणि विक्रेते, ५७ एजंटासह सेवन करणारे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:48 IST2025-02-04T11:46:39+5:302025-02-04T11:48:47+5:30
रविवारी रात्रीतून अमली पदार्थांचे ३४ तस्कर ताब्यात; कुख्यात गुन्हेगार अजय ठाकूरसह पत्नीचाही समावेश

छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे टार्गेट 'नशेखोर' आणि विक्रेते, ५७ एजंटासह सेवन करणारे ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्र्यांच्या दट्ट्यानंतर एनडीपीएस पथक व गुन्हे शाखेने ४८ तासांत अमली पदार्थांचे विक्रेते व सेवन करणाऱ्या ५७ जणांना ताब्यात घेतले. यात साताऱ्यातील कुख्यात गुन्हेगार व एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या अजय ठाकूर व त्याची पत्नी राणीलाही अटक करण्यात आली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून शनिवारपासून अंमली पदार्थांच्या सेवन करणारे व विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली. शनिवारी रात्री २४ गुन्हे दाखल करत श्वानांच्या मदतीने तस्करांच्या घराची झाडाझडती घेतली. रविवारीदेखील विविध पथकांनी आणखी ३४ गुन्हे दाखल करत जवळपास ३८ जणांना ताब्यात घेतले. यात पाच अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे.
११ दिवसांत पुन्हा अटक
२० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेला, गुन्हेगारांची टोळी चालवणारा अजय दि. २२ जानेवारी रोजी वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला. त्यानंतर सासु, पत्नीसह पुन्हा सक्रिय झाला होता. निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमाेल म्हस्के यांनी थेट त्याच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरातून १.४३ ग्रॅम गांजा, नशेच्या १६०, १२ ग्रॅम एमडी ड्रग्जच्या ११ पुड्या मिळून आल्या. नारेगावचा कुख्यात तस्कर अनिल माळवे, अरुण शिनगारे, संतोष खरे, अशोक भालेराव, दीपक मलके व गुजरातच्या आयेशा नामक महिला हे रॅकेट चालवतात. या सर्वांना सहआरोपी करत अजय व त्याच्या पत्नीची घरापासून ठाण्यापर्यंत धिंड काढली.
नशेविरोधात मोहीम उघडली
पोलिस ठाणे - कारवाया
सिडको - ५
जवाहरनगर - २
जिन्सी - १
सातारा - २
एम. सिडको - ४
एम. वाळूज - ४
सिटीचौक - ३
छावणी - ५
वेदांतनगर - २
हर्सूल - २
क्रांतीचौक - १
वाळूज - १
मुकुंदवाडी -१
बेगमपुरा - १
पुन्हा गुजरात कनेक्शन
अजयने चौकशीत अमली पदार्थांची बहुतांश तस्करी गुजरातमधून आयेशा खान नामक महिलेच्या माध्यमातून होत असल्याची कबुली दिली. यापूर्वी सिडकाेतील एका गोळ्या विक्रेत्याने आयेशाचे नाव सांगितले होते. मात्र, शहर पोलिसांकडून त्याबाबत तपासच झाला नाही.