छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मांजा विक्रेत्यांची 'कनी काटली'; ५ अटकेत, मांजाचे २०६ गट्टू जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:17 IST2025-12-10T17:16:41+5:302025-12-10T17:17:51+5:30

मांजा विक्रेत्यांवर पोलिसांच्या रात्रीच धाडी; दोन तासांत पाच विक्रेत्यांना अटक, पतंग विक्रेताच निघाला मुख्य तस्कर

Chhatrapati Sambhajinagar police 'cut the threads' of manja sellers; 5 arrested, 206 rolls of manja seized | छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मांजा विक्रेत्यांची 'कनी काटली'; ५ अटकेत, मांजाचे २०६ गट्टू जप्त

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मांजा विक्रेत्यांची 'कनी काटली'; ५ अटकेत, मांजाचे २०६ गट्टू जप्त

छत्रपती संभाजीनगर : जीवघेण्या नायलाॅन मांजा विक्रेत्यांविरोधात शहर पोलिसांनी कंबर कसली असून, रात्रीतून पतंग, मांजा विक्रेत्यांच्या घर, दुकानांवर छापेमारी सुरू केली आहे. सोमवारी रात्रीतून १२ तासांत पाच विक्रेत्यांना अटक करत २०६ गट्टू जप्त करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी या मांजाची खरेदी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मांजा बाहेर विकला गेल्याची भीती आहे.

काफिलउल्ला खान फजलउल्ला खान (२८) व शेख मुशीर अहमद अश्फाक अहमद (१९, दोघे रा. शरीफ कॉलनी), शेख फरदीन अब्दुल रज्जाक (२२, रा. शहाबाजार), तालेबखान शेरखान (२८, रा. फातेमानगर), मुद्दशीर उर्फ मुजीब अहमद नजीर अहमद (४५, रा. आजम कॉलनी, रोशनगेट) अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांची नावे आहेत. नायलॉन मांजामुळे तीन वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ठाणेदारांना मांजा विक्री आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. सोमवारी फिरोज हबीब शेख (४२), इस्माईल शेख ऊर्फ आदिल हाजी शेख (३२) यांना अटक झाली होती. त्यानंतर सोमवारी रात्रीतून छापेमारी झाली.

तीन पथकांच्या रात्रीतून धाडी
पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर यांच्या पथकांनी रात्री ११ वाजता छापे टाकण्यास सुरुवात केली. काळे यांच्यासह अंमलदार योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, राजेंद्र साळुंके, सुनील पवार, सागर पांढरे, जालिंदर गोरे, विजय निकम, राजाराम डाखोरे, संजय गावंडे यांनी सर्वप्रथम फरदीनला ताब्यात घेतले. फरदीनने तालेबकडून विकत घेतल्याचे सांगताच पथकाने त्याला रात्री ३ वाजता घरातून उचलले. दोघांच्या चौकशीत मुदस्सिरचे नाव निष्पन्न होताच उपनिरीक्षक अर्जुन कदम यांनी पहाटे मुदस्सिरच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने दोघांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.

तिसऱ्या पथकाचे जिन्सीत छापे
एकीकडे सिटी चौक परिसरात छापेमारी सुरू असताना जिन्सीतही गुन्हे शाखेच्या पथकाने छापे मारत काफिलउल्ला खान व व शेख मुशीरला अटक केली. दोघांकडे ६ गट्टू सापडले. न्यायालयाने त्यांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या पाचही आरोपींना मंगळवारी पोलिस आयुक्तालयात हजर करून रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.

आधी गुन्हा जामीनपात्र असल्याने आत्मविश्वास वाढला होता
शहरात ३५ वर्षांवर काळ पतंग विक्रेता म्हणून ओळख असलेला हीना पतंग दुकानाचा मालक मुदस्सिर उर्फ मुजीब अहमद नजीर अहमद हा पुन्हा एकदा नायलॉन मांजाच्या तस्करीत निष्पन्न झाला. त्याच्यावर आतापर्यंत नायलॉन मांजा विक्रीचेच पाच गुन्हे दाखल आहेत. मात्र, तेव्हा कलम जामीनपात्र असल्याने त्याची प्रत्येक वेळी अटक टळली. यावेळी मात्र, मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

सुशिक्षित पार्श्वभूमी, पैसे अन् पतंगाचा भारी नाद
-फरदीन सुशिक्षित कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांचा बेकरी व्यवसाय आहे. केवळ अधिकच्या पैशांसाठी त्याने हा प्रकार सुरू केला. तो तालेबकडून मांजा खरेदी करत होता. त्याच्याच घरात १९९ गट्टूंचा साठा सापडला. फरदीनवर आधीच सिटी चौक ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
-हर्सूलमध्ये राहणारा तालेब खान कीचन ट्रॉलीचे काम करतो. देशातील अनेक पतंग स्पर्धांमध्ये भाग घेतो. त्याच्याकडे अनेक प्रमाणपत्रे, पदके आहेत. पण त्याच्यावरही हाणामारीचा एक गुन्हा नोंद आहे.
काफिलउल्ला खान हा माजी नगरसेवकाचा मुलगा असून, त्याचा इलेक्ट्रिक कामाचा व्यवसाय आहे. तोदेखील मुदस्सिरकडूनच मांजा खरेदी करतो.
-काफिलउल्लाकडून टक्केवारीवर डिलिव्हरी बॉय असलेला मुशीर फूड डिलिव्हरीच्या नावाखाली मांजा पुरवत होता.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar police 'cut the threads' of manja sellers; 5 arrested, 206 rolls of manja seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.