व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले! १ कोटींचा कर बुडवणं पडलं महागात; GST विभागाकडून मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:34 IST2026-02-27T15:33:27+5:302026-02-27T15:34:15+5:30
नोटीस देऊनही जुमानलं नाही, अखेर जीएसटीने दुकानच गाठलं! कन्नडमधील व्यापाऱ्यावर जप्तीची कारवाई

व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले! १ कोटींचा कर बुडवणं पडलं महागात; GST विभागाकडून मालमत्ता जप्त
छत्रपती संभाजीनगर : राज्य वस्तू व सेवा कर विभागाने महसूल वसुली मोहिमेला वेग देत थकबाकीदार व्यापाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कन्नड तालुक्यातील एका व्यापाऱ्याकडे तब्बल रु. १.०२ कोटी इतकी कर थकबाकी प्रलंबित असल्याने त्यांची अचल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ अंतर्गत वारंवार नोटिसा बजावूनही संबंधित व्यापाऱ्याने थकबाकीची रक्कम न भरल्याने अखेर कायद्यातील कलम ७९ नुसार जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य जीएसटीचे अपर राज्यकर आयुक्त अभिजित राऊत यांच्या आदेशाखाली पार पडली.
या कारवाईस राज्यकर उपायुक्त नीलेश शेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर अधिकारी अविनाश चव्हाण यांनी प्रत्यक्ष कारवाई केली. राज्यकर निरीक्षक राजेंद्र जाधव आणि कर सहायक श्वेता जाधव हेही पथकात सहभागी होते.
करदात्यांनी आपली कर विवरणपत्रे वेळेत भरावीत आणि थकबाकी तातडीने अदा करावी. अन्यथा कायद्यानुसार जप्ती व इतर कठोर कारवाया टाळता येणार नाहीत. प्रामाणिक करदात्यांचे हित जपणे आणि शासनाचा महसूल सुरक्षित ठेवणे हेच विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे राऊत यांनी नमूद केले.