विजेचा खर्च कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मनपा ४०० एकरवर सोलार प्रकल्प उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 20:20 IST2025-10-25T20:19:58+5:302025-10-25T20:20:50+5:30
सध्या विजेचा खर्च जवळपास ७ कोटींपर्यंत जातोय. भविष्यात नवीन पाणीयोजना सुरू झाल्यावर खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे.

विजेचा खर्च कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मनपा ४०० एकरवर सोलार प्रकल्प उभारणार
छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी महापालिकेला जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत तीन ठिकाणी पाणी लिफ्ट करून आणावे लागते. त्यासाठी सध्या विजेचा खर्च जवळपास ७ कोटींपर्यंत जातोय. भविष्यात नवीन पाणीयोजना सुरू झाल्यावर खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४०० एकर जागेवर बीओटी तत्त्वावर सोलार प्रकल्प उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
नवीन पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. जानेवारी महिन्यात शहरवासीयांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणी मिळेल. योजना पूर्ण होईपर्यंत जुन्या जलवाहिन्या सुरूच ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन आणि जुन्या योजनांसाठी लागणारा विजेचा खर्च अफाट होईल. महापालिकेला हा खर्च आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यामुळे आतापासून प्रशासनाने पर्यायी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. भव्य सोलार प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करून महावितरणला देणे, हा एक संयुक्तिक मार्ग आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची गरज भासणार आहे. त्यासाठी सीएसएमआरडीएने (छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरण) ४०० एकर जागा देण्याची तयारी दर्शविली. वर्षाला २ कोटी रुपये जागेचे भाडे सीएसएमआरडीएला द्यावे लागेल. प्रकल्प उभारणीसाठी अगोदर राज्य शासनाकडे निधी मागणी केली जाईल. शासनाकडून सबसिडी किंवा अनुदान न मिळाल्यास बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारण्याचा मनोदय प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला. प्रकल्प उभारणीचा दरमहा खर्च कंत्राटदाराने ४ ते ५ कोटी रुपये घेतला तरी मनपाला हा प्रकल्प परवडणारा आहे. त्याशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही.
चार हजार अश्वशक्तीचे पंप
नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडी येथील जॅकवेलच्या ठिकाणी ४ हजार अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात येत आहेत. एक पंप पाणी ओढण्यासाठी राहील. दुसरा पंप तूर्त राखीव राहील. एक पंप २४ तास सुरू राहिला, तर विजेचा खर्च कोटींमध्ये जाईल, असा अंदाज आहे. भविष्यातील विजेचा खर्च कमी करण्यासाठी सोलार प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी नमूद केले.