कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ; 'ऑटोमोबाईल हब' छ. संभाजीनगरचे आर्थिक गणित कोलमडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:16 IST2026-03-24T13:15:38+5:302026-03-24T13:16:36+5:30
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगांवर दुहेरी संकट, कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ अन् कामगारांचाही घरवापसीचा इशारा

कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ; 'ऑटोमोबाईल हब' छ. संभाजीनगरचे आर्थिक गणित कोलमडणार
छत्रपती संभाजीनगर : युद्धामुळे आधीच गॅस तुटवड्याचा सामना करीत असलेल्या उद्योगांंच्या कच्च्या मालाचे दर दीडपट वाढले आहेत. यामुळे उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे उद्योजक सांगत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील विविध औद्योगिक वसाहतींत बहुआयामी उद्योग आहेत. मात्र सर्वाधिक उद्योग हे वाहन निर्मिती अर्थात ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित आहेत. जगभरातील विविध नामांकित वाहन निर्मिती कंपन्यांना येथील इंडस्ट्रीतून सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. यातील ॲल्युमिनिअम, तांबे, प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे दर वाढले असल्याचे उद्योजकांनी सांगितले. महिनाभरापूर्वी कॉपरचे दर ९०० रुपये किलो होते. ते आता १ हजार ४०० रुपयांपर्यंत गेले आहेत. तर ॲल्युमिनिअमचे दर १०० रुपये प्रति किलोने वाढले.
प्लास्टिक दाण्यांचा दर दुप्पट झाल्याचे मसिआ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी सांगितले. वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष वसंत वाघमारे म्हणाले की, युद्ध सुरू झाल्यापासून इंडस्ट्रीला लागणारा कच्च्या मालाची आयात कमी झाली. त्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातूनच गेल्या आठ ते दहा दिवसांत कच्च्या मालाचे दर २५ ते ३० टक्के वाढले. दर वाढलेले असले तरी उद्योगांना लागणारा कच्चा माल घ्यावाच लागणार आहे. यातून उद्योजकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. परिणामी, वस्तूंच्या किमती वाढतील. याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
प्लास्टिक रॉ मटेरियल, कॉपर, स्टीलची आपल्या इंडस्ट्रीला गरज असते. प्लास्टिक मॅट उद्योगांचा माल आखाती देशात निर्यात होताे. मॅट बनवण्यासाठी लागणारा प्लाास्टिक ग्रॅन्युअल हे पेट्रोलियम प्रॉडक्ट असते. काही दिवसांपासून प्लास्टिक ग्रॅन्युअलचे दर वाढले. सोबतच कॉपर, स्टीलचेही दर वाढले आहेत.
- अनिल पाटील, माजी अध्यक्ष, मसिआ
कामगारांना स्वयंपाकाचा गॅस मिळेना...
विविध कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. त्यांच्याकडे नोंदणीकृत गॅस कनेक्शन नाही. ते कुणाकडून तरी गॅस घेत असत. मात्र, आठ दिवसांपासून गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी कामगार करीत आहेत. घरमालक हिटर अथवा इलेक्ट्रिक शेगडी वापरू देत नाही. आमच्यासाठी गॅस उपलब्ध करा अन्यथा आम्ही गावाकडे जातो, असे कामगार सांगत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.