धक्कादायक! २५ वर्षांची आई कचरा वेचण्यात मग्न, तिची १२ वर्षांची मुलगी मैत्रिणीसह बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:46 IST2025-09-04T18:44:26+5:302025-09-04T18:46:55+5:30
कचरा वेचताना दोन मुली बेपत्ता; अनुचित प्रकाराच्या भीतीने पोलिसांसह कुटुंबीयही चिंताग्रस्त

धक्कादायक! २५ वर्षांची आई कचरा वेचण्यात मग्न, तिची १२ वर्षांची मुलगी मैत्रिणीसह बेपत्ता
छत्रपती संभाजीनगर : आईचे वय वर्षे २५. तिला पहिली मुलगी १२ वर्षांची तर दुसरे व तिसरे अपत्य अनुक्रमे ९ वर्षे व १४ महिन्यांचे. सोमवारी आई कचरा वेचण्यात मग्न असताना तिची १२ वर्षांची मुलगी आणि मैत्रिणीची दहा वर्षांची मुलगी, अशा दोन मुली अचानक बेपत्ता झाल्या. सोमवारी सायंकाळी नारेगावात घडलेल्या घटनेला ७२ तास उलटूनही मुली न सापडल्याने अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने पोलिसांसह कुटुंबीयही चिंताग्रस्त आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिसांचे पथक सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे मुलींचा माग काढण्याचा प्रयत्न करत होते.
२५ वर्षीय तक्रारदार महिला कचरा वेचण्याचे काम करते. कचरा वेचण्यासाठी गेल्यानंतर त्या सर्व मुलींना सोबत घेऊन जातात. १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता १२ वर्षांच्या मुलीसह नारेगावाच्या महानगरपालिका शाळेच्या परिसरात कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची मैत्रीणदेखील मुलीला घेऊन आली. कचरा वेचून झाल्यानंतर सायंकाळी ४:३० वाजता अन्य मुले, मुली परतली. मात्र या दोघी बेपत्ता झाल्या.
सर्वत्र शोध...
कुटुंबाने दोघींचा नारेगाव, मिसारवाडी, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत शोध घेतला. मात्र, त्या मंगळवारी देखील सापडल्या नाहीत. मंगळवारी दुपारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोघींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार सतीश जोगस तपास करत आहेत.
असे आहे वर्णन...
१० वर्षांची मुलगी साधारण ३ फूट उंचीची असून, सडपातळ बांधा, सावळा रंग, काळे डोळे असून, गालावर जुन्या जखमेचा व्रण आहे. तर १२ वर्षीय मुलगी ४ फूट उंच, सडपातळ बांधा, सावळा रंग व कपाळावर गोल गाेंदलेला ठिपका आहे. कोणाला आढळल्यास तत्काळ एमआयडीसी सिडको पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा पोलिसांसह रेल्वे पोलिसांशीही संपर्क
-पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मुली कुठल्या दिशेने गेल्यात, हे तपासण्याचा प्रयत्न करत हाेते. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत सुगावा लागलेला नव्हता.
-एमआयडीसी सिडको पोलिसांनी जिल्हा पोलिसांना कळवून रेल्वे पोलिसांशीही संपर्क साधला.
वयामुळे संभ्रम, पोलिसही अचंबित
ही दोन्ही कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगतात. यात १२ वर्षांच्या मुलीच्या आईने वय २५ सांगितले. हे ऐकून पोलिसही अचंबित झाले. तिने वयाचा कुठलाही पुरावा सादर न केल्याने तसेच वय नमूद केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.