छत्रपती संभाजीनगरात अफवांची टाकी 'फुल'; वाहनधारकांची पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:53 IST2026-03-04T13:53:19+5:302026-03-04T13:53:47+5:30
अफवा पसरली अन् छ. संभाजीनगरकर पंपांवर तुटून पडले, डीलर्स असोसिएशनचा मोठा खुलासा

छत्रपती संभाजीनगरात अफवांची टाकी 'फुल'; वाहनधारकांची पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी धावपळ
छत्रपती संभाजीनगर: इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार आणि इंधनाचा तुटवडा निर्माण होणार, अशा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या आहेत. या अफवांच्या धास्तीने छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी रात्रीपासून पाहायला मिळत आहे.
रात्रीपासून पंपांवर रांगा, वाहतूक विस्कळीत
मंगळवारी धूलिवंदन साजरा केल्यानंतर सायंकाळी अचानक शहरातील प्रमुख चौकांसह उपनगरातील पंपांवर गर्दी उसळली. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यांपर्यंत पोहोचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. नेहमी १००-२०० रुपयांचे पेट्रोल भरणारे दुचाकीस्वारही खबरदारी म्हणून टाकी 'फुल' करून घेताना दिसून आले.
इंधनाचा साठा मुबलक, अफवांवर विश्वास ठेवू नका! छत्रपती संभाजीनगरच्या पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांचे स्पष्टीकरण #chhatrapatisambhajinagar#marathwada#PetrolDieselPricepic.twitter.com/ssu67zfHFg
\— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 4, 2026
असोसिएशनचे स्पष्टीकरण: साठा मुबलक!
"शहरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. होळी आणि धूलिवंदनाच्या सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी डेपोतून साठा पोहोचण्यास उशीर झाला असेल, पण कुठेही तुटवडा नाही. युद्धामुळे दरवाढ किंवा साठा संपला, असे काहीही झालेले नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केले आहे.
प्रशासनाचा इशारा
विनाकारण गर्दी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे. सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश पुढे न पाठवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.