छत्रपती संभाजीनगर विभागाची बारावीनंतर दहावीतही घसरण; राज्यात सातव्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:34 IST2025-05-14T12:33:52+5:302025-05-14T12:34:57+5:30
बीड जिल्हा अव्वल, हिंगोली आणि परभणीच्या निकालात घसरण; तर ६८७ शाळांचा निकाल शंभर टक्के, तर ९ शाळांचा शून्य टक्के

छत्रपती संभाजीनगर विभागाची बारावीनंतर दहावीतही घसरण; राज्यात सातव्या स्थानी
छत्रपती संभाजीनगर : बारावीनंतर दहावी बोर्ड परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागाची राज्यात घसरण झाली. विभागाचा दहावीचा निकाल ९२.८२ टक्के लागला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये संभाजीनगर विभाग ७ व्या स्थानी आहे. विभागातील ६८७ शाळांचा निकाल शंभर टक्के तर ९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे आणि सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी पत्रकार परिषदेत निकालाची सविस्तर माहिती दिली. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातील ६४४ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८३ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ७० हजार ७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९२.८२ टक्के आहे. गतवर्षी विभागाचा निकाल ९५.१९ टक्के होता. विभागात ६८७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. यात परभणी जिल्ह्यातील ५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ तर हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एका शाळेचा यात समावेश आहे.
७१ विद्यार्थ्यांवर कारवाई
कॉपीमुक्त अभियानात ३७ विद्यार्थी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवलंब करताना आढळले. परीक्षोत्तर ४७ विद्यार्थ्यांनी गैरमार्ग अवलंबल्याचे दिसले. अशी ८४ प्रकरणे बोर्डासमोर सुनावणीस आली. सुनावणीअंती १३ विद्यार्थी निर्दोष आढळले. उर्वरित ७१ प्रकरणातील विद्यार्थ्यांची संबंधित विषयातील संपादणूक रद्द केली.
जिल्हानिहाय निकाल
जिल्हा - उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारी
छत्रपती संभाजीनगर - ६२३३६ - ९३.६०
बीड - ४००७७ - ९६.४७
परभणी - २५५१६ - ८९.२४
जालना - २८८८३ - ९१.४४
हिंगोली - १३९०८ - ८९.०७
---------------------
एकूण - १७०७५० - ९२.८२