छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कुंभमेळा विकास आराखडा ९ हजार ६३३ कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:15 IST2025-11-01T19:14:11+5:302025-11-01T19:15:38+5:30
१ कोटी भाविक कुंभमेळ्यात येण्याचा अंदाज ठेवून तयारी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कुंभमेळा विकास आराखडा ९ हजार ६३३ कोटींच्या घरात
छत्रपती संभाजीनगर : नाशिक कुंभमेळा २०२७ निमित्त जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, वेरुळ, पैठण व आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखडा ९६३३ कोटी ५१ लाख रुपयांच्या घरात गेला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आराखड्याचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण झाले.
२०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून अनेक भाविक, साधुसंत हे विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. त्यात जिल्ह्यातील वेरुळ आणि पैठण ही ठिकाणे महत्त्वाची आहेत. एक कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत येतील, या अंदाजाने कृती आराखडा तयार केला आहे. परिवहन व वाहतूक व्यवस्था, मूलभूत सुविधा, भाविक पर्यटकांची सोय व राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक स्थळांचे जतन इ. बाबी विचारात घेऊन सुविधा असतील.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. यावेळी जि.प.चे सीईओ अंकित, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी संचालन केले.
लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा
मंत्री अतुल सावे.... रस्ते विकास व वीज वितरण, ट्रान्सफाॅर्मर व विद्युत खांबांचे स्थानांतरण करावे.
खा. डॉ. भागवत कराड..... वेरुळप्रमाणेच भद्रा मारोती क्षेत्राचाही आराखड्यात समावेश करावा.
आ. विलास भुमरे........पैठण तालुक्यातील कामांना प्राधान्य मिळावे. नाथनगरीत भाविक मोठ्या प्रमाणात येतील.
आ. प्रशांत बंब ------ आराखडा हा सुविधांच्या विकासासाठी असून त्याचा उपयोग जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी व्हावा.
आ. रमेश बोरनारे ...... वैजापूर तालुक्यातील तसेच नाशिककडून येणाऱ्या रस्त्यांची विकासकामे करावीत.
आ. विक्रम काळे ..... भाविकांची ने- आण करण्यासाठी अंतर्गत सार्वजनिक बस वाहतूक सुविधा असावी.
खा. डॉ. कल्याण काळे...... स्थानिक उत्पादनांच्या विक्रीमुळे रोजगार वाढेल. वैजापूर परिसराचाही समावेश करावा.
कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात समाविष्ट कामांमुळे जिल्ह्याचा शाश्वत विकास साधला जावा, या दृष्टीने कामांचे नियोजन करा. पर्यटनाच्या क्षेत्रात जिल्हा पुढे जाईल, हे पाहा.
- संजय शिरसाट, पालकमंत्री
असा आहे आराखडा....
कुंभमेळा पार्श्वभूमीवर विकासकामांचा आराखडा ७१२६ कोटी २९ लाख रुपयांचा असून पैठण व आपेगावचा आराखडा २५०७ कोटी २२ लाखांचा आहे.
वाहतूक व्यवस्था : वाहनतळांसाठी १३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग आणि निवास व्यवस्थेचे नियोजन.
भाविकांसाठी सुविधा : स्वच्छतागृहे, स्त्री, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती, सुविधांची दुरुस्ती, शुद्ध पेयजलाची व्यवस्था.
सुरक्षा व्यवस्था : २४ तास सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे देखरेख, तात्पुरत्या पोलिस चौक्या, हेलिपॅड उभारणी, विश्रामगृह.
पर्यटन नियोजन : वेरुळ लेणी व मंदिर सजावट व प्रकाश योजना, दर्शनाचे वेळापत्रक नियोजन, अधिकृत मार्गदर्शन व बहुभाषिक माहिती, स्थानिक तीर्थक्षेत्र व्यवस्थापन सज्ज असेल.