‘लम्पी’ साथरोगाच्या शिरकावाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा ‘अलर्ट मोड’वर; चार जनावरे बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:30 IST2025-08-05T17:21:44+5:302025-08-05T17:30:02+5:30
मागील दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबविल्यानंतरही गोवंश पशुधनामध्ये लम्पी त्वचा रोगाची लागण पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही.

‘लम्पी’ साथरोगाच्या शिरकावाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा ‘अलर्ट मोड’वर; चार जनावरे बाधित
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि सोयगाव तालुक्यात ४ पशुधनाला या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी पशुसंवर्धन विभागाला अलर्ट केले आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबविल्यानंतरही गोवंश पशुधनामध्ये लम्पी त्वचा रोगाची लागण पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या साथरोगाच्या विषाणूचा नवीन व्हेरिएंट संक्रमित तर झाला नसावा, अशी पशुपालकांमध्ये भीती आहे. सन २०२३ अखेरीस लम्पी बाधित जिल्ह्यातील गायवर्गीय ३२३ पशुधन दगावले होते. त्यामुळे जि. प. पशुसंवर्धन विभागाने त्यावर्षी ३ लाख ८६ हजार ८६७ जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस दिली होते. तरीही सुमारे ५ हजार जनावरांना लम्पीची लागण झाली होती. या साथरोगाची लागण आटोक्यात आणण्यासाठी शेवटी जिल्ह्याच्या सीमेबाहेरून अथवा आपल्या जिल्ह्यातून बाहेर जनावरांचे स्थलांतरण थांबविणे, आठवडी बाजार बंद करणे, यावर रोख लावला होता. बाधित जनावरांना क्वारंटाईन (विलगीकरण) करणे, गोठे स्वच्छ करणे आदी मोहीम राबविली होती. त्यानंतर हळूहळू प्रादुर्भाव कमी होत गेला.
मात्र, अलीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमावर्ती जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात लम्पी साथरोगाचे गायवर्गीय पशुधन बाधित होत असल्याच्या घटना वाढल्या. बघता बघता आपल्या जिल्ह्यातही या आजाराने शिरकाव केला. या आजाराची पूर्वपीठिका बघता पशुपालक व पशुसंवर्धन विभागही हादरून गेला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तत्काळ लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून, आजपर्यंत सुमारे ४ लाख जनावरांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात तिसगाव येथे १ गोऱ्हा, फुलंब्री तालुक्यात हिवरा येथे १ गाय व १ वासरू आणि सोयगाव तालुक्यात जरंडी येथे १ बैल, अशा चार जनावरांना लम्पीची लागण झाली आहे.
४,०६,५७८ गायवर्गीय पशुधन
३,९९,८६५ पशुधनाचे लसीकरण पूर्ण
३ तालुक्यात पशुपालकांना अलर्ट
लम्पी आजाराची लक्षणे
लम्पी आजारामध्ये जनावरांना ताप येतो. चारा व पाणी कमी घेणे किंवा बंद होणे. नाका-डोळ्यातून चिकट स्त्राव येतो. जनावरांच्या अंगावर गाठी येतात आणि पायावर सूज येऊन जनावर लंगडते. अशी सर्वसाधारण लक्षणे लम्पी या साथरोगाची दिसून येतात.