छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्गाला ‘ग्रीन सिग्नल’; दिल्ली २५० 'किमी'ने जवळ येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:40 IST2025-03-12T14:40:33+5:302025-03-12T14:40:58+5:30
या रेल्वे मार्गाच्या ‘फायनल लोकेशन सर्व्हे’साठी रेल्वे मंत्रालयाने २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्गाला ‘ग्रीन सिग्नल’; दिल्ली २५० 'किमी'ने जवळ येणार
छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित आणि गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव या ९३ कि.मी. च्या रेल्वे मार्गाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. या रेल्वे मार्गाच्या ‘फायनल लोकेशन सर्व्हे’साठी रेल्वे मंत्रालयाने २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबरोबर धाराशिव-बीड- छत्रपती संभाजीनगर या २४० कि.मी. रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कामाचा खर्च आणि मिळणारा परतावा, हे कारण पुढे करून छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच ठेवला जात असल्याची ओरड होत आहे. ‘लोकमत’ने १२ ऑगस्ट २०२४ रोजी ‘छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वेमार्गाचे काय?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यापूर्वीही वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. अखेर या रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मुहूर्त मिळाला आहे.
१६० कि.मी.चा फेरा थांबेल
दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेंना आजघडीला मनमाडहून जावे लागत आहे. या रेल्वे मनमाडहून चाळीसगाव आणि जळगावमार्गे उत्तर भारताकडे जातात. छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगाव रेल्वेने जाण्यासाठी आजघडीला हा १६० कि.मी.चा प्रवास करण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ जातो. छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव असा ९३ किलोमीटरचा रेल्वे मार्ग झाल्यानंतर, मनमाड न जाता थेट रेल्वे गाड्या चाळीसगावला पोहोचतील. प्रवाशांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय टळेल.
रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर हा रेल्वेमार्गही कागदावरच राहिला. बीडचे खा. बजरंग सोनवणे यांनी या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. सोनवणे यांना एका पत्राद्वारे या मार्गासंदर्भात माहिती दिली. या नवीन रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत, असे रेल्वेमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले. त्यानंतर आता या रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
दिल्लीचे अंतर २५० कि.मी.ने होईल कमी
छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वेमार्गाने दिल्लीचे अंतर २५० कि.मी.ने कमी होईल. उत्तर-दक्षिण भारताला जोडणारी ही रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल. आता लवकरात लवकर हे अंतिम सर्वेक्षण पूर्ण केले पाहिजे.
- डाॅ. अण्णासाहेब शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय महामार्ग ५२ व छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नियोजित रेल्वेमार्ग संघर्ष समिती
अनेक वर्षे संघर्ष
छत्रपती संभाजीनगर : चाळीसगावमार्गे कन्नड या रेल्वेलाइनसाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. धाराशिव-बीड- छत्रपती संभाजीनगर व छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव या रेल्वेमार्गामुळे दक्षिण ते उत्तर भारत जोडला जाणार आहे.
- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
उत्तर-दक्षिण व्यापारी मार्ग
हे दोन्ही रेल्वेमार्ग झाल्यावर मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. सातवाहन काळातील उत्तर-दक्षिण व्यापारी मार्ग परत जन्म घेणार आहे, ही मराठवाड्यासाठी आनंद वार्ता आहे.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक