बोगस कॉल सेंटरमध्ये नॉर्थ ईस्टच्या तरुणांकडे संभाषण, बंगालकडे डेटा, गुजरातकडे पैशांचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:02 IST2025-10-29T13:01:40+5:302025-10-29T13:02:48+5:30
देशभरातून जमविले युवक; प्रत्येकी २५ ते ३० हजार रुपये महिन्याला मानधन, फसवणुकीतून पैसा मिळाला तर इन्सेन्टिव्ह वेगळे

बोगस कॉल सेंटरमध्ये नॉर्थ ईस्टच्या तरुणांकडे संभाषण, बंगालकडे डेटा, गुजरातकडे पैशांचे काम
छत्रपती संभाजीनगर: चिकलठाणा एमआयडीसीतून अमेरिकन नागरिकांना फसविणाऱ्या कॉल सेंटरमध्ये रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायची. या सेंटरमध्ये कामाची विभागणी राज्यनिहाय करण्यात आलेली होती.
सेंटरमधून मिळणाऱ्या पैशांत ४५ टक्के वाटा हा जॉन नावाच्या आरोपीला मिळत असे. उर्वरित ५५ टक्क्यांमध्ये भावेश चौधरी, भाविक पटेल, सतीश लाडे, वलय व्यास, अब्दुल फारूक मुकदम शाह ऊर्फ फारुकी यांच्यामध्ये वाटणी होई. फसवणुकीसाठी लागणारी नागरिकांची माहिती पश्चिम बंगालच्या आरोपींकडे, तर नॉर्थ-ईस्टकडील आरोपींना अमेरिकन इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण देऊन नागरिकांसोबत संवाद साधण्याची जबाबदारी होती.
कॉल सेंटरमध्ये कामाची विभागणी केलेली होती. फसवणूक करून मिळविलेल्या पैशांचा व्यवहार गुजरातच्या मुख्य आरोपीकडे देण्यात आलेला होता. ४५ टक्के वाटा हा जॉन नावाच्या आरोपीला मिळत असे. उर्वरित ५५ टक्क्यांमध्ये भावेश चौधरी, भाविक पटेल, सतीश लाडे, वलय व्यास, अब्दुल फारूक मुकदम शाह ऊर्फ फारुकी यांच्यामध्ये वाटणी होई. त्याशिवाय फसवणुकीसाठी लागणारी नागरिकांची माहिती पश्चिम बंगालच्या आरोपींकडे, तर नॉर्थ-ईस्टकडील आरोपींना अमेरिकन इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण देऊन नागरिकांसोबत संवाद साधण्याची जबाबदारी होती.
प्रत्येक डॉलरला तीन रुपये इन्सेन्टिव्ह
बनावट कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ ते ३० हजार रुपये पगार देण्यात येत होता. त्याशिवाय अमेरिकन नागरिकाची फसवणूक झाल्यानंतर प्रत्येक डॉलरवर संबंधित कर्मचाऱ्यांना तीन रुपये एवढा इन्सेन्टिव्ह देण्यात येत होता. साधारणत: अमेरिकन नागरिकाची २ ते ३ हजार डॉलरची फसवणूक करण्यात येत होती. त्यानुसार प्रत्येक व्यवहारावर कर्मचाऱ्यांना ६ ते ९ हजार रुपये एवढी रक्कम मिळत होती. त्यामुळे फसवणूक करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी मेहनत घेत होता. पगारापेक्षा अधिक पैसे हे इन्सेन्टिव्हमध्ये मिळत. त्यामुळे कर्मचारी ‘ओव्हरटाइम’ही करीत.
देशभरातील विविध राज्यांतील युवक
बनावट कॉल सेंटर चालविण्यासाठी देशभरातून युवकांना आणण्यात आले होते. त्यात मुख्य आरोपी हे गुजरात राज्यातील आहेत. त्याशिवाय पश्चिम बंगाल, आसाम, तेलंगणा, नागालॅंड, मेघालय, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मिझोराम, मुंबई, मणिपूर, कर्नाटक, इ. राज्यांतील आरोपींचा समावेश आहे. यातील प्रत्येक आरोपीच्या ग्रुपवर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली होती.
पोलिस महासंचालक कार्यालयाचा वॉच
एमआयडीसी सिडको पोलिसांनी केलेल्या कारवाईची तीव्रता आंतरराष्ट्रीय पातळीवरील होती. त्यात अमेरिकन नागरिकांची फसवणूक होत असल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी प्रकरण अधिक गंभीरतेने हाताळले आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता हे संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून होते. त्यात गुप्ता यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी काम केलेले असल्यामुळे कारवाईतील सहभागी अधिकाऱ्यांकडून थेट माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. प्रत्येक कारवाई अतिशय काळजीपूर्वक केल्यामुळे पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास बराच वेळ लागला.
आरोपींच्या वैद्यकीय तपासणीची कसरत
कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या आरोपींचा संख्या ११७ एवढी मोठ्या प्रमाणात होती. त्यातील बहुतांश आरोपींना मराठी, हिंदी भाषा बोलताही येत नव्हती. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसोबत ते व्यवस्थित संवादही साधू शकत नव्हते. ११७ आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दुपारी चार वाजेपासून पोलिसांच्या व्हॅन मिनी घाटी व घाटी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सज्ज होत्या. प्रत्येकी २० आरोपींना घेऊन गाडी जात होती. दवाखान्यात संपूर्ण आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ लागत होता. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत आरोपींची वैद्यकीय तपासणीच करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनाही आरोपींना घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले.
प्रसारमाध्यमांची तुफान गर्दी
पोलिसांनी छापा टाकलेल्या ठिकाणी सकाळपासून प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. इमारतीमधील प्रत्येक गोष्ट टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. त्यातच पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी कारवाईसंदर्भात अधिकृत निवेदन केले.
हालचालींचा परिसरातील इतरांना होता संशय
कारवाई झालेल्या इमारतीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली होती. त्यातच गुजरात पासिंगच्या गाड्या मोठ्या प्रमाणात येत होत्या. त्यातच अलिशान गाड्या असल्यामुळे मागील काही दिवसांपासून हा चर्चेचा विषय बनला होता. त्यातच इमारतीच्या मालकाकडे काहींनी संशय व्यक्त केला हाेता. त्यानुसार इमारत मालकानेही संबंधितांशी चर्चा केली होती. मात्र, आयटीचे काम असल्याचे सांगण्यात आल्यामुळे दुर्लक्ष केले.
कर्मचाऱ्यांना बोलण्याचे प्रशिक्षण
कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अमेरिकन इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षित झाल्यानंतर संबंधितांना प्रत्यक्षातील काम दिले जात होते. त्याशिवाय अमेरिकन नागरिकांच्या जीवनशैलीविषयीसुद्धा माहिती संबंधितांना देण्यात येत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.
छत्रपती संभाजीनगरची निवड का?
कॉल सेंटर चालविणारे मुख्य आरोपी हे गुजरातचे आहेत. त्यानी सुरुवातीच्या काळात गुजरातमध्ये कॉल सेंटर उभारले होते. मात्र, त्याचा भंडाफोड झाल्यामुळे तेथून मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सेटअप हलविण्यात आला. त्याचीही मध्य प्रदेश पोलिसांना कुणकुण लागल्यामुळे त्या ठिकाणाहून संपूर्ण सेटअप छत्रपती संभाजीनगरमध्ये हलविण्यात आला. त्यातही चिकलठाणा एमआयडीसीतील आयटीच्या संबंधित ठिकाणाची निवड करण्यात आली. त्यामागेही आयटीचेच काम सुरू असल्याचे भासविण्यात आले. संंबंधित इमारत मालकासोबत आयटीचे काम असल्याचाच करारनामा केला.
दररोज कोट्यवधींची उलाढाल
अमेरिकन नागरिकांच्या फसवणुकीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल कॉल सेंटरमधून करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे पोलिस आरोपींच्या चाैकशीतून किती लोकांना फसवले? त्यातून अधिकृतपणे उलाढाल किती केली? बंदी असलेल्या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून हवालाद्वारे भारतीय चलनात किती पैसे आले? याविषयीची माहिती घेणार आहेत.
पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांची धाडसी कारवाई
शहर पोलिस दलातील धाडसी महिला पोलिस अधिकारी असलेल्या एमआयडीसी सिडको ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी नुकताच ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने अचूक माहिती जमा करीत वरिष्ठांच्या परवानगीने उपनिरीक्षक राधा लाटे, हवालदार संजय नंद, संतोष सोनवणे, संतोष गायकवाड, प्रकाश सोनवणे, अरविंद पुरी, रतन नागलोत, तेलुरे, डोईफोडे, भामरे यांना सोबत घेत छापा टाकला. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर सायबर, फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलावले. त्यानुसार सर्वांना सोबत घेत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.