शिंदेसेनेच्या आमदाराला हवी उद्यानातील १ एकर जागा; भाजप नगरसेवकांचा कडाडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:26 IST2026-03-06T13:24:58+5:302026-03-06T13:26:50+5:30
सिडको एन-४ मधील उद्यानाची जागा आमदारांच्या संस्थेला देऊ नका; भाजप नगरसेवकांचे मनपा आयुक्तांना साकडे

शिंदेसेनेच्या आमदाराला हवी उद्यानातील १ एकर जागा; भाजप नगरसेवकांचा कडाडून विरोध
छत्रपती संभाजीनगर: सिडको एन-४ भागातील पारिजातनगर येथील उद्यानासाठी राखीव असलेल्या ५ एकर जागेवरून आता नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. यातील १ एकर जागा शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या 'मॉर्डन शिक्षण प्रसारक मंडळाला' खेळाच्या मैदानासाठी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, याला प्रभाग २३ मधील भाजपच्या चारही नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला असून, ही जागा कोणालाही देऊ नये, असे साकडे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना घातले आहे.
काय आहे नेमका वाद?
सिडको एन-४ मधील सर्व्हे नंबर २३-२४ मध्ये उद्यानाची ५ एकर जागा आहे. यातील १ एकर जागा आपल्या संस्थेला मिळावी यासाठी आमदार बोरनारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने आयुक्तांना तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. ही बाब समजताच स्थानिक भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, बालाजी मुंडे, सत्यभामा शिंदे आणि सुरेखा गायकवाड यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.
रहिवाशांचाही खंबीर पाठिंबा
येथील नागरिकांनी 'पारिजात नगर प्रतिष्ठान' संस्था स्थापन केली असून, उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेतून स्पोर्ट्स क्लबला जागा देण्यास रहिवाशांचाही कडाडून विरोध आहे. नगरसेवकांनी रहिवाशांच्या भावना आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर आयुक्तांनी ही जागा कोणालाही दिली जाणार नसल्याचे आश्वासन दिले असून, सध्या तरी या प्रकरणावर पडदा पडला असला तरी राजकीय हालचालींमुळे रहिवासी सतर्क आहेत.