छत्रपती संभाजीनगर अनैतिक मानवी तस्करीचा ट्रान्झिट पॉइंट बनले; नीलम गोऱ्हे यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:59 IST2025-09-19T19:59:11+5:302025-09-19T19:59:44+5:30
नीलम गोऱ्हेंच्या बालगृहांसाठी पोलिस दक्षता समिती स्थापन करण्याच्या सूचना

छत्रपती संभाजीनगर अनैतिक मानवी तस्करीचा ट्रान्झिट पॉइंट बनले; नीलम गोऱ्हे यांचा खुलासा
छत्रपती संभाजीनगर : शहरातील बारवर आतापर्यंत पोलिसांनी धाडी टाकल्या. त्यात बांगलादेशी मुली पकडल्या गेल्या. ही अनैतिक मानवी तस्करी आहे. हे शहर त्याचा ट्रान्झिट पॉइंट बनले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याबाबत पोलिस आयुक्तांना सांगितले, असा खळबळजनक खुलासा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी येथे केला.
डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी भगवानबाबा बालिका आश्रम, सावली मुलींच्या बालगृहास भेट देऊन तेथे मुलींना मिळणाऱ्या सेवा-सुविधांची पाहणी केली. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ज्या मुली अनाथ, ‘पोक्सो’च्या बळी आहेत त्यांना चुकीचे मार्गदर्शन मिळते आणि त्याला या मुली बळी पडतात. त्यामुळे त्यांना बंधने नको असतात. यावर बालगृहातील मुलींना वैयक्तिक समुपदेशनाची गरज आहे. संभाजीनगरच्या पोलिस अधीक्षकांशी आम्ही बोललो. शहरात प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांची महिला दक्षता समिती नेमण्याच्या सूचना केल्या आहेत. या समितीने महिन्यातून एकदा बालगृहांमध्ये जाऊन तेथील मुलींशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. पाहणी हा हेतू न ठेवता आम्ही तुमच्यासोबत आहोत, ही भावना ठेवावी. महिला व बालविकासासोबत महसूलसह इतर खात्यांनीही यात काम केले तर चांगले फलित निघेल.
चिंतेची बाब
शहरात जुन्या ‘पोक्सो’च्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार अजूनही सापडलेले नाहीत. ही गंभीर बाब असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. पोलिसांनी याबाबत आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पुन्हा आई झाल्यासारखे वाटले
त्या म्हणाल्या, “बालगृहातील मुलींना भेटल्यावर पुन्हा आई झाल्यासारखे वाटले. त्यांच्या डोळ्यांत मला स्वप्नं दिसली. या मुलींच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण हवे आहे. बालमहोत्सवात त्यांना सहभागी व्हायचंय, त्यांना कबड्डी, खो-खो खेळायचेय. या मुली उद्या समाजाचे नेतृत्व करू शकतात, त्या ‘नकोशा’ नाहीत. सावली बालगृहातील एका मुलीला ९व्या इयत्तेत ९१ टक्के मिळालेत. तिची खूप मोठी स्वप्नं आहेत. यावेळी मुलींना आम्ही त्या रोज काय खातात इथपर्यंत विचारले. त्यांनीही मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधला. शहरात मुलींचे निरीक्षणगृह सुरू करण्याबाबतही हालचाल सुरू असल्याचे सूतोवाच गोऱ्हे यांनी केले.”
नीलम गोऱ्हे यांच्या अभ्यास गटातील मेघना भोसले, अस्मिता राजे, रोहिणी ठोंबरे, विद्या डाडर, प्रतिभा राऊत या सदस्यांचाही बालगृहातील संवादात समावेश होता.