छत्रपती संभाजीनगरातून थेट परदेशवारीला ‘इमिग्रेशन’चे ‘चेकमेट’; परदेशी पाहुणे नाराज
By संतोष हिरेमठ | Updated: March 18, 2026 20:01 IST2026-03-18T20:00:29+5:302026-03-18T20:01:13+5:30
परदेशी पाहुणे नाराज, शासन कधी घेणार मनावर? १३ विमानतळांत समावेश असूनही संभाजीनगरची विमानसेवा 'ग्राउंडेड'

छत्रपती संभाजीनगरातून थेट परदेशवारीला ‘इमिग्रेशन’चे ‘चेकमेट’; परदेशी पाहुणे नाराज
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरसारख्या जागतिक वारसास्थळांनी नटलेल्या शहरातून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी, ही अपेक्षा गेली दोन वर्षे केवळ आश्वासनांपुरतीच मर्यादित राहिली आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सर्व सुविधा तयार, एअरलाइन्सची तयारी पूर्ण; तरीही केवळ इमिग्रेशन चेकपोस्टच्या मंजुरीअभावी शहराची परदेशवारी ‘रनवे’वरच थांबली आहे.
पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरुळ आणि अजिंठा यांसारखी जागतिक वारसास्थळे आहेत. या दोन स्थळांशिवाय इतरही ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. रोज हजारो पर्यटक या शहरात येतात. तरीही या शहरात आंतरराष्ट्रीय विमानसेवा का नाही, असा सवाल गत आठवड्यात ‘फॅमल रायझिंग टूर’साठी जर्मनीहून आलेल्या पाहुण्यांनी उपस्थित केला. दोन वर्षांपूर्वी एअर एशिया एअरलाइन्सने बँकाॅक विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या (बीओआय) अधिकाऱ्यांनी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानप्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. मात्र, गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टला (आयसीपी) मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच आहे. ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरू होते, याकडे विमान प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
प्रोत्साहन योजना नावालाच
गतवर्षी जूनमध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) देशभरातील १३ निवडक विमानतळांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू केली. या १३ विमानतळांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे; परंतु शहरातून विमानाने परदेशवारी करण्याची प्रतीक्षाच आहे. उन्हाळा, पावसाळा तसाच जाईल; परंतु किमान पर्यटन हंगामापासून म्हणजे हिवाळ्यापासून शहरातून परदेशवारी घडण्यास सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाठपुरावा सुरू
विमानतळावर इमिग्रेशन चेक पोस्ट लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. इमिग्रेशनची सुविधा सुरू झाल्यानंतरच आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी आमच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)
सर्व मानक सुविधा उपलब्ध
इमिग्रेशन चेक पोस्टसाठी आवश्यक असलेल्या सर्व मानक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, ‘बीओआय’कडून तपासणीही करण्यात आली असून, काही बदल आवश्यक असल्यास त्याबाबतचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
- शरद येवले, संचालक, छत्रपती संभाजीनगर विमानतळ