छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 09:59 IST2024-04-03T07:17:53+5:302024-04-03T09:59:34+5:30
Chhatrapati Sambhajinagar Fire News: छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
- मुनीर शेख
छत्रपती संभाजीनगर - शहरातील छावणी परिसरात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे.
इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोट
छावणी परिसरातील एका तीन मजली इमारतीच्या तळ मजल्यावर कपडा दुकान आहे. रात्री दुकानातील बोर्डला इलेक्ट्रिक बाईकचे चार्जर लावण्यात आले होते. या चार्जराचा स्फोट झाल्याने कपडा दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. पंचनामा करून मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी पाहणी केली आहे.
या अग्नितांडवामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत. असीम वशिम शेख (३ वर्षे), परी वशीम शेख (२ वर्षे), वशीम शेख अब्दुल अजीज (३० वर्षे), तनवीर वशीम शेख (२३), हमिदा बेगम अब्दुल अजीज (५०), शेख सोहेल अब्दुल अजीज (३५), रेश्मा शेख सोहेल शेख (२२) या सर्वांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे.