---
औरंगाबाद ः बिडकीन येथील ग्रामसेवक आत्महत्येप्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी पैठण येथील पंचायत समितीच्या कार्यालयात १५ जणांचे जबाब नोंदवले. यात ग्रामसेवकांसह अभियंत्यांनी त्यांना गटविकास अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून झालेल्या त्रासाची आपबीती सांगितली. चाैकशी समितीचा अहवाल पुढील दोन दिवसांत विभागीय आयुक्तांना सादर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने पैठण येथील गटविकास अधिकारी, त्यांचे सहकारी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामविकास अधिकारी संजय शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. तसेच पैठण तालुक्यातील ग्रामसेवक दहशतीखाली असल्याने सखोल चाैकशीची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी चाैकशीचे आदेश दिले होते. बुधवारी झालेल्या चाैकशीत गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्या कार्यकाळातील आदेश व कार्यभाराची चाैकशी कवडे यांनी केली.
शिंदे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नीने बिडकिन पोलिसांत चाैघाविरुद्ध फिर्याद दिली. पण अद्याप त्या आरोपींना अटक झाली नाही. त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी गुरुवारी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची भेट घेणार असल्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भीमराज दाणे यांनी सांगितले. पैठण येथे झालेल्या चाैकशी समितीची ग्रामसेवक युनियनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी दाणे यांच्यासह के. पी. जंगले, विश्वनाथ पुरी आदींची उपस्थिती होती.
---
आज ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहे. आवश्यक कागदपत्र तपासली. यासंदर्भातील अहवाल पुढील दोन दिवसांत विभागीय आयुक्तांना सादर करु.
-संतोष कवडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद.