Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:43 IST

Girish Mahajan on Mumbai traffic jam angry lady viral video: भाजपच्या मोर्चाने झालेल्या वाहतूककोंडीमुळे एका महिलेने थेट गिरीश महाजन यांनाच जाब विचारला होता

Girish Mahajan on Mumbai traffic jam angry lady viral video: लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुंबईत भाजपने 'जन आक्रोश' महिला संमेलन आयोजित केले. यावेळी वाहतूककोंडी झाल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन आपला संताप व्यक्त केला. तसेच त्यांच्यावर टीकाही केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, विरोधकांनी यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. याचदरम्यान, गिरीश महाजन यांनी या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

महिलेच्या संतापाबाबत काय म्हणाले गिरीश महाजन?

"फार काही झालं नाही. ट्रॅफिकमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. त्यामुळे त्या ओरडत होत्या. तोच विषय आहे. आम्ही या मोर्चासाठी परवानगी घेतली होती. वाहतूककोंडीमुळे सामान्यांना त्रास झाला याची मला कल्पना आहे. मी त्यांना सॉरीदेखील म्हणालो होते. पण त्यांनी जी भाषा वापरली ती योग्य नाही. मोर्चासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. अनेक मोर्चे निघतात. सगळ्याच पक्षांचे मोर्चे निघतात. त्यावेळी कोंडी होत असते हे मान्यच करावे लागेल. त्यावेळी एक महिला संतप्त झाल्या आणि काहीही बोलत होत्या. त्यांनी पोलिसांना रितसर तक्रार द्यायला हवी होती. तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, असा जाब त्यांनी मला विचारला. त्यावेळी त्यांची भाषा खूपच वाईट होती."

"रस्ता तर ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."

"असे मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतो, लोकांना त्रास होतो, त्यांचाही त्रागा वाटतो हे खरं आहे. आम्हालाही हे मान्य आहे. पण हा मोर्चा महिलांच्या हक्कांसाठी होता. जेव्हा मोठी आंदोलने होतात तेव्हा काय होते, याची कल्पना साऱ्यांनाच आहे. पण त्या महिलेला पोलिसांकडे तक्रार करता आली असती किंवा सौम्य भाषेत राग व्यक्त करता आला असता. पण त्या ज्या भाषेत बोलल्या, बाटली फेकून मारली, ते संयुक्तिक नव्हते. मोर्चा असल्यावर रस्ता तर ब्लॉक होणारच, थोडा त्रास तर होतोच, पण महिलेने वापरलेली भाषा किंवा संताप व्यक्त करण्याची पद्धत योग्य नव्हती," असे महाजन म्हणाले.

आमच्या मोर्चाचे नियोजन चुकलेले नव्हते...

"मी आणि इतर पोलिसांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या ऐकत नव्हत्या. त्यांनी संताप व्यक्त करण्यासाठी पाण्याची बाटलीही फेकून मारली. त्यांचा राग अनावर झाला होता. आम्ही जो मोर्चा काढला होता, तो महिलांसाठी काढला होता. मोर्चा किंवा आंदोलन असल्यास असे प्रकार घडत असतात याची आपल्याला कल्पना आहे. आम्ही यापुढे याबाबत काळजी घेऊ. पण त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हती. आमच्याकडे पोलिसांची परवानगी होती, आम्ही त्यांना मोर्चाचा ठरलेला मार्गही दिलेला होता. कालच्या मोर्चामध्ये लोकांना त्रास झाला हे खरं आहे. पण प्रत्येक मोर्चा किंवा आंदोलनात हा त्रास होतच असतो. आमच्या मोर्चाचे नियोजन चुकलेले नव्हते."

यापुढे आम्ही काळजी घेऊ!

"पोलिसांनी त्यांच्याशी कुठलाही गैरव्यवहार केला नाही. त्यांचा राग स्वाभाविक आहे. पण त्या खूपच जास्त रागात बोलल्या. अशाप्रकारचा हा मोर्चा पहिल्यांदाच काढलेला नव्हता. याआधीही मोठे मोर्चे काढण्यात आले आहेत. त्यावेळी हायवे आणि एक्सप्रेसवेदेखील जाम झाले होते. असे पहिल्यांदा घडलेले नाही. पण यापुढे आम्ही याची काळजी घेऊ," असेही महाजन म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Traffic Jams Inevitable During Protests: Girish Mahajan Reacts to Public Outcry

Web Summary : Girish Mahajan addressed the public's anger over traffic jams caused by a BJP rally. He acknowledged the inconvenience, stating such disruptions are expected during large protests. Mahajan defended the rally's purpose, highlighting it was for women's rights, but said the woman's anger and language were inappropriate. He promised to take precautions in the future.
टॅग्स :गिरीश महाजनमहिला आरक्षणभाजपाव्हायरल व्हिडिओ