चंपाचौक ते जालना रोड टोटल सर्व्हे स्टेशन सुरू; मालमत्ताधारकांचे विरोध न करता सहकार्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:30 IST2025-08-12T19:29:45+5:302025-08-12T19:30:11+5:30

अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार करण्याचे मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रस्त्यात किमान ६०० ते ७०० मालमत्ता बाधित होत आहेत.

Champa Chowk to Jalna Road Total Survey Station started; No opposition from property owners, only cooperation | चंपाचौक ते जालना रोड टोटल सर्व्हे स्टेशन सुरू; मालमत्ताधारकांचे विरोध न करता सहकार्यच

चंपाचौक ते जालना रोड टोटल सर्व्हे स्टेशन सुरू; मालमत्ताधारकांचे विरोध न करता सहकार्यच

छत्रपती संभाजीनगर : चंपा चौक ते जालना रोडपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी सोमवारी महापालिकेच्या नगररचना विभागाने टोटल सर्व्हे स्टेशन सुरू केले. पोलिस बंदोबस्तात सकाळी १०:३० वाजता सर्व्हे सुरू झाला. एकाही मालमत्ताधारकाने विरोध न करता सहकार्यच केले. दिवसभरात जिन्सी, रेंगटीपुरा येथील नागरी वसाहतीमधून पथक भवानीनगर येथील नाल्यापर्यंत पोहोचले. 

जुन्या शहरातून जालना रोडला येण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार करण्याचे मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रस्त्यात किमान ६०० ते ७०० मालमत्ता बाधित होत आहेत. त्यामुळे मनपाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासक जी. श्रीकांत यांनी रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत चंपा चौक ते जालना रोडचा समावेश केला. जुन्या आराखड्यात रस्ता १०० फूट दर्शविण्यात आला. नवीन आराखड्यात त्याला ६० फूट केले. त्यामुळे नवीन वाद जन्माला आला. नवीन आराखड्यात रस्त्याची अलाईनमेंट सुद्धा बदलण्यात आली. मनपाने ठराव घेऊन शासनाला पाठविला. शासनाने जुन्या आराखड्याप्रमाणे रस्ता रुंद करण्यास सहमती दर्शविली.

सोमवारी सकाळी १०:३० वाजता जिन्सी, मुकुंदवाडी पोलिसांसह मनपाच्या नागरी मित्र पथकाला चंपा चौकात बोलावण्यात आले. बंदोबस्तात नगररचना विभागाने टोटल सर्व्हे स्टेशनला सुरुवात केली. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. पोलिसांना वारंवार नागरिकांना पिटाळावे लागत होते. कनिष्ठ अभियंता राहुल मालखेडे, कौस्तुभ भावे, रामेश्वर सुरासे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांच्यासह मनपाचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

टोटल सर्व्हे स्टेशन म्हणजे काय?
या प्रक्रियेत बाधित मालमत्तांची एक शीट तयार होते. त्यावर कोणत्या मालमत्ताधारकांची किती जागा रस्त्यात जाणार, हे कळते. रस्त्यात कोणत्याही एका परवानगी दिलेल्या मालमत्तेला बेस धरून सर्व्हे करण्यात येतो. यानंतर जेएमएस करण्यात येईल. ही प्रक्रिया भूमी अभिलेख विभाग करेल. कोणती मालमत्ता किती बाधित होते, ते सांगण्याचे काम त्यांचे आहे.

Web Title: Champa Chowk to Jalna Road Total Survey Station started; No opposition from property owners, only cooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.