सीईटीचा निकाल उंचावला
By Admin | Updated: June 7, 2014 00:19 IST2014-06-06T23:39:27+5:302014-06-07T00:19:51+5:30
परभणी : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल उंचावला आहे.

सीईटीचा निकाल उंचावला
परभणी : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल उंचावला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यातून वाढल्याने जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाच्या संधी वाढल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत विविध वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल गुुरुवारी रात्री संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील नेट कॅफेवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. जिल्ह्याचा एकत्रित निकाल मिळू शकला नाही. परंतु प्राप्त माहितीनुसार यावर्षीच्या सीईटी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल उंचावला आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे बारावी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आज उत्साह दिसून आला.
सर्वसाधारण गटातून परभणी येथील नवनाथ जावळे यास ७५० पैकी ५३१ गुण मिळाले आहेत. भौतिकशास्त्रात १३१, रसायनशास्त्रात १५० आणि जीवशास्त्रात २९५ गुण त्याने मिळविले असून,राज्याच्या गुणवत्ता यादीत (एसएमएल) त्यांचा क्रमांक ३६७ वा आहे. त्याचप्रमाणे सतीश रोडगे याने ५११ गुण मिळविले असून, त्याचा एसएमएल ५५८ आहे. प्राजक्ता शेळकेने राज्याच्या गुणवत्ता यादीत ५७१ वा क्रमांक मिळइवला. रिद्धी कलंबरकरने ७९१ वा क्रमांक मिळविला असून, सायली दुधाटे हिने १३३२ वा क्रमांक मिळविला आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गात हेमंत भडंगे याने राज्याच्या गुणवत्ता यादीत ३० वा क्रमांक मिळविला. याच प्रवर्गात शीतल डुकरे हिने ४० वा क्रमांक मिळविला. इतर मागासवर्ग प्रवर्गात महेफुजा अहेमदी शेख गौस हिने राज्यात ४६१ वा क्रमांक मिळविला तर विशेष मागास प्रवर्गात रामेश्वर कुऱ्हाडकर याने राज्याच्या यादीत ४९३ वा क्रमांक मिळविला.
(प्रतिनिधी)
तरीही निकाल चांगला...
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थी लातूर, अहमदपूर, कोटा आदी ठिकाणी शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. हे विद्यार्थी बाहेरगावी गेल्यानंतरही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील सीईटी परीक्षेत आपली चुणूक दाखवून दिली आहे.
जागा रिक्त राहण्याची शक्यता
४डायरेक्टर आॅफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च मुंबईने (डीएमएआर) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २८८ गुणांची कट आॅफ निश्चित केले आहे. परंतु अनुसूचित जमाती प्रवर्गातून विद्यार्थ्यांचा निकाल कमी लागला असल्याने या प्रवर्गातील जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी दाखविली गुणवत्ता
यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.बोर्डाच्या आणि एन.सी.ई.आर.टी.च्या पुस्तकांचे लाईन टू लाईन वाचन केल्यास निश्चित यश मिळते. ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले त्यांनी सीईटीमध्येही चांगले गुण मिळविले, हेच यावरुन सिद्ध होते, असे डॉ.हुलसुरे फाऊंडेशनचे डॉ.मारोती हुलसुरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी रसायन, भौतिक आणि जीवशास्त्राला समान महत्त्व देत अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी भावी विद्यार्थ्यांना केले आहे.