रुजू होत असल्याचे परस्पर पत्र दिल्यानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ कार्यालयात आलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 13:33 IST2021-02-20T13:23:01+5:302021-02-20T13:33:23+5:30
१ हजार कोटींचा महसूल असलेल्या स्मार्ट सिटीच्या सीईओपदी आजपर्यंत महापालिकेचे आयुक्तच काम पाहत आले आहेत.

रुजू होत असल्याचे परस्पर पत्र दिल्यानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ कार्यालयात आलेच नाहीत
औरंगाबाद : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने औरंगाबादस्मार्ट सिटीच्या सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची १ फेब्रुवारी रोजी नियुक्ती केली. १८ दिवसांनंतर स्मार्ट सिटीच्या कार्यालयात न येता त्यांनी परस्पर आपण रुजू होत असल्याचे पत्र दिले. विशेष बाब म्हणजे त्यांच्या नियुक्तीला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे सीईओ पदाचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१ हजार कोटींचा महसूल असलेल्या स्मार्ट सिटीच्या सीईओपदी आजपर्यंत महापालिकेचे आयुक्तच काम पाहत आले आहेत. स्मार्ट सिटीचे काम सुरळीत सुरू असताना अचानक १ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाने सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची परस्पर नियुक्ती केली. यासंदर्भात शासनाकडून एकदाही विद्यमान सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांना विचारणा करण्यात आली नाही. पुढील पाच वर्षे स्मार्ट सिटी बस कशा पद्धतीने चालेल, दीडशे कोटी रुपयांचा जंगल सफारी पार्क, १९८ कोटी रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा प्रोजेक्ट असे अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पांडेय यांनी राबविले. त्यांच्या या कार्यपद्धतीची पावती म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना त्यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट दिली होती. नगर विकास विभागाने परस्पर केलेल्या नियुक्तीचा वाद पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर मांडण्यात आला.
शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे सीईओपदी पांडेय यांनाच कायम ठेवावे अशी मागणी केली. दरम्यान गुरुवारी बाबासाहेब मनोहरे यांनी जिल्हाधिकारी यांना एक पत्र लिहून आपण स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाचा पदभार घेत असल्याचे पत्र दिले. मनोहरे गुरूवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात आलेच नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. परस्पर पदभार घेता येऊ शकतो का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सोमवारपर्यंत पालकमंत्री सुभाष देसाई या प्रकरणी मोठा निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.