सेलूला मिळाले नवीन अधिकारी
By Admin | Updated: June 11, 2014 00:20 IST2014-06-10T23:58:23+5:302014-06-11T00:20:51+5:30
मोहन बोराडे, सेलू महसूल अधिकाऱ्यांसह इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, शहराला नवीन अधिकाऱ्यांची टीम मिळाली आहे़ त्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील

सेलूला मिळाले नवीन अधिकारी
मोहन बोराडे, सेलू
महसूल अधिकाऱ्यांसह इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, शहराला नवीन अधिकाऱ्यांची टीम मिळाली आहे़ त्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे़
लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर अनेक अधिकारी बदलीच्या तयारीत होते़ त्यातच दोन दिवसांपूर्वी महसूल व पोलिस विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांनी सेलू येथे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला़ त्यामुळे त्यांची लातूर येथे बदली झाली आहे़ त्यांच्या जागी उस्मानाबादहून प्रशांत सूर्यवंशी हे रुजू होणार आहेत़ १० महिन्यांपूर्वी तहसीलदार म्हणून रुजू झालेले पांडुरंग माचेवाड यांचीही पूर्णा येथे बदली झाली आहे़ माचेवाड यांची अवघ्या दहा महिन्यांतच बदली करण्यात आली आहे़ त्यांचे प्रमुख पुढाऱ्यांशी मतभेद झाल्यामुळे ते सेलू येथे काम करण्याच्या मनस्थितीत नव्हते़ त्यांच्या जागी औरंगाबाद येथून आसाराम छडीदार हे सेलूचे तहसीलदार म्हणून येणार आहेत़ पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत सिनगारे यांनी सेलू येथे तीन वर्षे सेवा बजावली़ त्यानंतर त्यांची औरंगाबाद ग्रामीण पोलिस ठाणे येथे पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे़ त्यांच्या जागी तात्पुरता पदभार पोलिस निरीक्षक बेंबाळे यांच्याकडे देण्यात आला आहे़ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ अरुण रोडगे यांची पदोन्नती झाली असून, ते हिंगोली येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जाणार आहेत़ त्यामुळे त्यांच्या जागी नवीन वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयाला कधी मिळेल हे सांगता येत नाही़ दरम्यान महसूल व इतर प्रमुख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे नवीन अधिकारी सेलूत रुजू होणार आहेत़ ग्रामीण भागातील व शहरी भागातील अनेक प्रश्न रेंगाळलेले आहेत़ त्यामुळे या अधिकाऱ्यांची प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहणार आहे़ नवीन टीम मिळाली तरी कामकाजाची पद्धत कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे़
अनेक कार्यालयात प्रभारी अधिकारी
शहरातील अनेक कार्यालयात अद्यापही कायमस्वरुपी अधिकारी आलेले नाहीत़ नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पाठक हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी मानवतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पदभार सोपविण्यात आला आहे़
पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत सिनगारे यांच्या बदलीनंतर प्रभारी पदभार बेंबळे यांच्याकडे देण्यात आला आहे़ अद्यापही कायमस्वरुपी पोलिस निरीक्षकाची नियुक्ती झालेली नाही़ शहरातील वातावरण पाहता शिस्तप्रिय अधिकारी मिळावा, अशी अपेक्षा आहे़
बीडीओही प्रभारी
ग्रामीण विकासाचा पंचायत समिती हा प्रमुख कणा आहे़ अनेक योजना याच कार्यालयामार्फत राबविल्या जातात़ त्यामुळे कार्यक्षम अधिकारी असणे आवश्यक आहे़ मात्र एक वर्षापासून विस्तार अधिकाऱ्यांकडे बीडीओंचा पदभार सोपविण्यात आलेला आहे़