शिवजयंती उत्सव शांततेत साजरा करा; पाेलिस उपायुक्तांचे आवाहन
By राम शिनगारे | Updated: February 14, 2023 20:07 IST2023-02-14T20:06:08+5:302023-02-14T20:07:31+5:30
एमआयटी हायस्कूलमध्ये शांतता समितीची बैठक

शिवजयंती उत्सव शांततेत साजरा करा; पाेलिस उपायुक्तांचे आवाहन
औरंगाबाद : येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नागरिकांनी उत्साहात साजरी करतानाच शांतता राखली पाहिजे, पोलिसांसह शासकीय यंत्रणेला मदत केली पाहिजे, असे आवाहन परिमंडळ दोनचे पाेलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी केले.
पुंडलिकनगर, जवाहरनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येते. या शिवजयंतीनिमित्त पोलिस उपायुक्त नांदेडकर यांच्या अध्यक्षतेत एमआयटी हायस्कूलमध्ये मंगळवारी दुपारी शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीला उस्मानपुरा विभागाचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल ससे, पुंडलिक नगरच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे, जवाहर नगरचे निरीक्षक शिवाजी तावरे यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने शिवजयंतीनिमित्त काढलेले परिपत्रकच पदाधिकाऱ्यांच्या समोर वाचून दाखविण्यात आले. त्यामध्ये असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे, असेही पोलिस उपायुक्त नांदेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी निरीक्षक राजश्री आडे, शिवाजी तावारे यांनीही काही सूचना दिल्या. यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी बबन डिडोरे पाटील, अशोक दामले, राजेश पवार, शैलेश भिसे, सूरज शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, कैलास गायकवाड, अखिल शेख, बापू कवळे, राजू राठोड, अर्जुन सरोसे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.