व्यावसायिकाचे २५ लाख दिलेच नाही, वरून जिवे मारण्याची धमकी; कुणाल बाकलीवाल पुन्हा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 23:19 IST2025-02-08T23:18:05+5:302025-02-08T23:19:00+5:30
पोलिस माझे काहीच करत नाहीत, म्हणत केटरिंग व्यावसायिकास जिवे मारण्याची धमकी; बारा दिवसांतच कुणाल बाकलीवाल अटकेत

व्यावसायिकाचे २५ लाख दिलेच नाही, वरून जिवे मारण्याची धमकी; कुणाल बाकलीवाल पुन्हा अटकेत
छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकावणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल (३८, रा. बीड बायपास) वर बारा दिवसांतच पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जाण्याची वेळ आली. व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडाकडून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दुसरा गुन्हा दाखल करून सातारा पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री अटक केली.
अमित कासलीवाल (रा. श्रीकृष्णनगर, देवळाई) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. ५ नाेव्हेंबर २०२२ रोजी बाकलीवालच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी कासलीवाल यांनी अडीच हजार लाेकांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्याचे १६ लाख रुपये बिल देण्यास बाकलीवालने नकार दिला. पैशांची मागणी केल्यावर बाकलीवाल धमकावत होता. ९ डिसेंबर २०२४ रोजी बाकलीवालने पुन्हा कासलीवाल यांना घरी बोलावले. मुलीच्या वाढदिवसाचे काम केल्यास संपूर्ण पैसे देण्याचे आश्वासन दिले. १७ डिसेंबर रोजी कासलीवाल यांनी ९ लाख ७० हजारांचे काम केले. मात्र, बाकलीवालने तेही पैसे देण्यास नकार दिला.
बाराव्या मजल्यावर मारहाण
१२ जानेवारी रोजी बाकलीवालने कासलीवाल यांना कमलनयन बजाज रुग्णालयासमोरील एका अर्धवट इमारतीच्या बाराव्या मजल्यावर बोलावले. दुपारी ३ वाजता तेथे बाकलीवाल, त्याचा चालक, एक नोकर व सागर भानुशाली होते. त्यांनी कासलीवाल यांच्यावर हॉकीस्टीक, लाकडी दांडा, लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. नोकराने त्यांची ३.२ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून घेतली. सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून अनेकांना पाठवली. त्यांना एका खोलीत तीन तास कोंडून ठेवत भावाला बोलावून सुटका केली.
पोलिस माझे काहीच करत नाहीत
या सर्व घटनेत बाकलीवाल कासलीवाल यांना सातत्याने ओळखी, ‘बडेजाव’ सांगून धमकावत होता. पोलिस माझे काहीच करत नाहीत, असे सांगून जिवे मारण्याची धमकी दिली. परिणामी, कासलीवाल, त्यांचे कुटुंब दहशतीत होते. २४ जानेवारी रोजी वाहतूक पोलिसांसाेबतच्या हुज्जतीनंतर बाकलीवालला पोलिसांनी गुडघ्यावर बसवत अटक केली. त्यानंतर कासलीवाल यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांच्याकडे तक्रार केली. बगाटे यांनी शनिवारी साताऱ्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांना कारवाईचे आदेश दिले. ताठे यांनी गुन्हा दाखल करुन बाकलीवालच्या मुसक्या आवळल्या.