आदर्श विद्यालय मास कॉपी प्रकरणात संस्था अध्यक्ष, पर्यवेक्षक, पोलिसांसह २८ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 19:35 IST2025-02-24T19:32:09+5:302025-02-24T19:35:02+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या पाहणीनंतर कारवाई; फुलंब्रीतील आदर्श विद्यालय कारवाईच्या कचाट्यात

आदर्श विद्यालय मास कॉपी प्रकरणात संस्था अध्यक्ष, पर्यवेक्षक, पोलिसांसह २८ जणांवर गुन्हे
फुलंब्री : तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयाच्या बारावीच्या परीक्षा केंद्रास शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता येथे सामूहिक कॉपी आढळली. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरूद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात शनिवारी बारावीचा गणित विषयाचा पेपर होता. या केंद्राला दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता अनेक बाहेरील व्यक्ती केंद्राबाहेर जाताना आढळून आले. पोलिस केंद्राबाहेर बसून होते. ते केंद्रात येणाऱ्यांना थांबवत नव्हते. तसेच परीक्षा केंद्राच्या बाजूंनी मोठ्या प्रमाणात कॉप्या, पुस्तके फेकलेले आढळले. ते त्यांनी कर्मचाऱ्यांमार्फत जमा करून त्यांची पाहणी केली असता ते सर्व गणित विषयाचे दिसून आले. या सर्व कॉप्या उपस्थित कर्मचाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना पुरविल्याचे किंवा विद्यार्थ्यांनी सोबत आणल्यानंतर त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांनी काढून न घेतल्याचे दिसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यात या संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवा, तसेच संबंधित मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख, पर्यवेक्षकांसह बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या कारवाईच्या आदेशामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
२८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांच्या फिर्यादीवरून संस्था अध्यक्ष लताबाई काशिनाथ जाधव, सचिव योगेश काशिनाथ जाधव, पर्यवेक्षक पी. ए. जाधव, नेहा लगड, एस. यू. भोपळे, पी. एस. काकडे, ए. बी. थोरात, ए. एन. शेख, के. बी. पवार, एस. जी. लोखंडे, ए. एन. सुरडकर, ए. बी. गायकवाड, आर. आर. वेताळ, पी. के. घुगे, एन. एस. ठाकूर, आर. बी. झाला, ए. बी. जाधव, व्ही. डी. तायडे, पी. एस. वाकळे, एम. डी. पाटील, व्ही. व्ही नलावडे, एल. के. डोळस, जे. बी. पवार, एस. टी. निर्मळ, बैठे पथकातील तलाठी आर. एस. देशमुख, पोलिस जमादार पंकज पाटील, होमगार्ड बी. एस. चव्हाण, जे. बी. पवार अशा एकूण २८ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.